*जिओहॉटस्टारकडून ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा, २४ नोव्हेंबरपासून होणार प्रीमियर*
_२५ भागांचा हा नवा सीझन महाभारतातील निर्णायक अध्याय उलगडणार; दर आठवड्याला नवे एपिसोड रिलीज होणार_
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि आजही तितक्याच प्रासंगिक असणाऱ्या कथांमध्ये ‘महाभारत’ अग्रस्थानी आहे. कुटुंब, महत्त्वाकांक्षा, निष्ठा, संघर्ष आणि ‘धर्म’ या शाश्वत प्रश्नांची ही गाथा मानवी स्वभाव आणि मानवी भविष्याला आकार देणाऱ्या पर्यायांवर प्रकाश टाकते. आता याच महाकाव्याची भव्यता पुन्हा एकदा डिजिटल पडद्यावर अवतरणार आहे. जिओहॉटस्टारने आपल्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून या नव्या सीझनचा प्रीमियर होणार आहे.
या नव्या सीझनचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्यात महाभारतातील सर्वात निर्णायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाची झलक पाहायला मिळत आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण आणि तिथे भगवान श्रीकृष्णाचे प्रकट होणे, तसेच ‘जेव्हा जेव्हा अधर्माचा अतिरेक होईल, तेव्हा मी अवतार घेईन’ हा त्यांचा संदेश महाभारताचा मूळ गाभा अधिक दृढ करतो. हा प्रसंग एका अशा संघर्षाची पार्श्वभूमी तयार करतो, जिथे धर्म आणि अधर्म यांमधील युद्ध व्यक्ती आणि संपूर्ण साम्राज्याचे भवितव्य ठरवते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रोहित जयसिंह वैद यांनी या सीझनचे दिग्दर्शन केले आहे. या भागात पांडवांचा पुढील प्रवास दाखवण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्यांना आयुष्यातील धोके, बदलणाऱ्या निष्ठा आणि जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.
जिओस्टार आणि कलेक्टिव्ह स्टूडियोज हिस्ट्रीव्हर्स यांच्या भागीदारीतून साकारलेली ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ ही मालिका प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. विशेष म्हणजे, या मालिकेतील पात्रांना, भव्य सेटला आणि संपूर्ण वातावरणाला जिवंत करण्यासाठी अत्याधुनिक ‘एआय-पावर्ड व्हिज्युअलायझेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या एआई तंत्रज्ञान आणि प्रोडक्शनची धुरा ‘गॅलरी५’ ने सांभाळली असून, विजय सुब्रमण्यम हे या मालिकेचे निर्माते आहेत.
२५ भागांचा हा नवा आणि थरारक सीझन २४ नोव्हेंबरपासून ‘जिओहॉटस्टार’वर प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, दर आठवड्याला याचे नवे एपिसोड रिलीज केले जातील.
































