सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंचं ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक

सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंचं ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक

मराठी मिडियम मालिकेतून येणार भेटीला

 स्टार प्रवाहची आगामी मालिका मराठी मिडियमची सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक करणार आहेत. या मालिकेत भार्गवी निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारणार असून विशाखा शुक्रे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आपल्या मतांवर ठाम असलेली विशाखा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहते. विशाखा एका मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून आलेली आहे. तिचा नवरा सुस्वभावी असला तरी कर्तृत्वाच्या बाबतीत कमी पडतो, हे तिने फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यामुळे आपल्या मुलाने वडिलांसारखं होऊ नये, यासाठी तिने त्याच्या संगोपनात कोणतीही कसर सोडलेली नाही.

विशाखाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ब्रँडेड नसलेल्या गोष्टींबद्दल तिला चीड आहे. अस्वच्छपणा तिला अजिबात सहन होत नाही. टेबल मॅनर्स आणि एटिकेट्स याबद्दल ती सहज रकाने लिहू शकते. तिचा ठाम विश्वास आहे की, ‘जे जे परदेशी, ते ते चांगलं.’ त्यामुळे जुन्या चालीरीती आणि परंपरांना तिच्या लेखी फारसं महत्त्व नाही.

या भूमिकेबद्दल भार्गवी चिरमुले म्हणाल्या, ‘स्टार प्रवाहसोबत सहा वर्षांनंतर पुन्हा जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. स्टार प्रवाह वाहिनी सातत्याने वेगवेगळे विषय मालिकांच्या माध्यमातून हाताळत असतात. ‘मराठी मिडियम’ची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळं आहे. आतापर्यंत मी निगेटिव्ह भूमिका फारशा साकारलेल्या नाहीत. त्यामुळे हे पात्र साकारताना कस लागतोय. विशाखाची स्वतःची एक विचारसरणी आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा वेगळा दृष्टिकोन आहे. या व्यक्तिरेखेतून माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.’ तेव्हा नक्की पाहा नवी मालिका मराठी मिडियम सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

IPRoyal Pawns