‘विच्छा माझी पुरी करा’ नाटक नव्याने रंगभूमीवर…
नाटककार वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक आता नव्या ढंगात रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन राजेश शिंदे यांनी केले आहे. या नाटकात संतोष पवार व ‘अनाजीपंत’ फेम महेश कोकाटे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह साक्षी जोशी, संजय चांदगुडे, माणिक खटिंग, दिनेश साबळे, शिवप्रसाद पासलकर हे कलाकार भूमिका साकारत आहेत. ‘केदार क्रिएशन’ निर्मित हे नाटक रंगभूमीवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या नाटकाच्या निर्मात्या वर्षा शेंबेकर या आहेत. वैभव शेंबेकर, ऋषिकेश सावंत व नयन अमराळे यांनी या नाटकाचे संगीत संयोजन केले आहे. आदिती सुतार यांची नृत्ये, अनुप शिंदे यांचे नेपथ्य व साहिल शिंदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.
या नाटकात अभिनेता संतोष पवार प्रमुख भूमिकेत असून, त्याला महेश कोकाटे यांची साथ मिळाली आहे. ‘अनाजीपंत’ म्हणून महेश कोकाटे याआधीच प्रसिद्ध आहेत. आता ते नाटकात काम करताना दिसून येत आहेत. या नाटकाबद्दल बोलताना महेश कोकाटे सांगतात, “जवळजवळ दहा वर्षानंतर मी नाटक करतोय. आमच्या नाटकात माझे सहकलाकार संतोष पवार असल्यामुळे ही भूमिका करणे मला थोडे सोपे गेले. त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी मला सांगितल्या आहेत आणि त्या मी करायचा प्रयत्न करतोय. सध्या आमच्या नाटकाला लोकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. हे नाटक मला करायला मिळत आहे त्यासाठी आमचे दिग्दर्शक राजेश शिंदे आणि आमच्या निर्मात्या वर्षा शेंबेकर यांचे मी आभार मानतो. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक माझ्या हाती आले असल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो”.
अभिनेता संतोष पवार सांगतो, “मला असे वाटते की कलाकाराला जर स्वतःचा कस बघायचा असेल तर असे नाटक त्याने केले पाहिजे. आयुष्यात कधीतरी हे नाटक करायचे, अशी इच्छा मनात होती. आमच्या निर्मात्या वर्षाताई शेंबेकर आणि दिग्दर्शक राजेश शिंदे यांच्यामुळे यावेळी हा योग जुळून आला आहे. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक करण्यासाठी विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला आणि आता आम्ही हे नाटक सादर करत आहोत”.
नाटकाचे दिग्दर्शक राजेश शिंदे सांगतात, “लोकनाट्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जरा वेगळा झाला आहे. नवीन पिढीला कळले पाहिजे की लोकनाट्य कसे असते आणि हाच हेतू या नाटकाच्या मागे आहे. आम्ही आता नवीन ढंगात हे नाटक सादर करत आहोत. आमच्या नाटकात सगळेच कलाकार खूप छान काम करत आहेत. मला जी टीम मिळाली आहे, ती उत्तम आहे. प्रत्येक प्रयोग संपल्यानंतर आम्हाला स्टॅंडिंग ओव्हेशन मिळते, हे आमचे यश आहे असे म्हणावे लागेल”.































