रक्तामांसातील जिवंत थ्रिल, ‘अ परफेक्ट मर्डर’

*’अ परफेक्ट मर्डर’: इन्स्पेक्टर घारगे बनून सतीश राजवाडे पुन्हा एकदा सज्ज; थराराचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक!*

मुंबई: मराठी रंगभूमीवर आपल्या अफाट उत्कटतेने आणि खिळवून ठेवणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे थ्रिलर नाटक म्हणजेच अ परफेक्ट मर्डर’. सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित आणि नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, या नाटकात प्रेक्षकांचे लाडके अभिनेते सतीश राजवाडे पुन्हा एकदा इन्स्पेक्टर घारगे यांच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

*’इन्स्पेक्टर घारगे आणि माझे अतुट नाते– सतीश राजवाडे*

सुमारे ३५० हून अधिक यशस्वी प्रयोग पूर्ण केले आणि त्यातले सतिश यांनी जवळपास १२० प्रयोगांमध्ये अभिनय केला. या भूमिकेत पुन्हा परतण्याबाबत सतीश राजवाडे सांगतात, “‘अ परफेक्ट मर्डर’ हे असंच एक नाटक आहे, ज्याच्या माध्यमातून मी तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा मराठी रंगभूमीवर परतलो होतो. या भूमिकेसाठी मला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे सर्व पुरस्कार मिळाले होते. हा असा एक पात्राचा प्रवास आहे, जो माझ्या मनाशी कायमचा जोडला गेला आहे. पुन्हा त्याच युनिटसोबत आणि त्याच भूमिकेत परतणं हा एक अद्भूत आणि भावनिक अनुभव आहे. या प्रवासात प्रिया आमची अत्यंत जवळची मैत्रीण आणि सहकलाकार होती, जिची उणीव आम्हाला कायम जाणवेल.”

*कमबॅकचे आव्हान आणि प्रेक्षकांचे प्रेम*

कोणत्याही कलाकारासाठी कमबॅक करणे जितके खास असते, तितकेच ते आव्हानात्मकही असते, यावर प्रकाश टाकत ते पुढे म्हणतात,”लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात,पण हेच आव्हान एका अभिनेत्याला अधिक सतर्क ठेवतं.भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा ती पडद्यावर किंवा मंचावर किती प्रभाव पाडते, हे महत्त्वाचे असते. इन्स्पेक्टर घारगे ची भूमिका मला तो प्रभाव पाडण्याची उत्तम संधी देते.थिएटर हे प्रेक्षकांच्या थेट प्रतिसादाचे माध्यम असल्यामुळे मिळणारी तात्काळ ऊर्जा हा एक वेगळाच आनंद असतो.”

*रक्तामांसातील जिवंत थ्रिल अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी*

नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी प्रत्यक्ष येऊन भरभरून कौतुक करणे आणि अनेकांनी हे नाटक १० ते १२ वेळा पाहणे, हेच या नाटकाच्या यशाची खरी पावती आहे. प्रेक्षकांना रक्तामांसातील जिवंत थ्रिल अनुभवण्याची संधी देणारे हे नाटक आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘बदाम राजा प्रोडक्शन’च्या माध्यमातून पुन्हा एकदा हा थरार अनुभवायला मिळणार आहे. थ्रिल, रहस्य आणि अभिनयाचा जबरदस्त संगम असलेला हा अनुभव प्रेक्षकांसाठी नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे!

IPRoyal Pawns