अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी ‘जीवनगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी ‘जीवनगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा.
स्वरस्वामिनी आशा भोसले यांना आदरांजली; ‘मर्म बंधातली ठेव ही’ या विशेष नाट्यसंगीत कार्यक्रमाचे
आयोजन
मुंबई, : मराठी रंगभूमीची मध्यवर्ती व शतकोत्तर परंपरा लाभलेली संस्था असलेल्या अखिल
भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी नाटककार गो. ब. देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित
करण्यात येणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा व कलावंत मेळावा यंदा रविवार, दि. १४ जून २०२६
रोजी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार
आहे.
मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रंगकर्मी, कलाकार आणि नाट्यसेवकांचा गौरव
या सोहळ्यात करण्यात येणार असून, यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते दिलीप
प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना प्रदान करण्यात येणार आहे. आपल्या दीर्घ,
वैविध्यपूर्ण आणि प्रभावी अभिनय कारकिर्दीद्वारे या दोन्ही कलावंतांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि
दूरदर्शन क्षेत्र समृद्ध केले आहे. त्यांच्या कलासेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार
असल्याची माहिती नाट्य परिषदेतर्फे देण्यात आली आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा
मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू
तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन
जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी, शशी प्रभू, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी,
तसेच नाट्य परिषदेचे पदाधिकारी, रंगकर्मी, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
यावर्षीच्या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे स्वरस्वामिनी आशा भोसले यांना वाहण्यात
येणारी आदरांजली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव करताना, स्वरगंधर्व मास्टर दीनानाथ
मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यगीतांचा ‘मर्म बंधातली ठेव ही’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर
करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मिती ग्रुप सादर करणार असून, प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, मृण्मयी फाटक आणि निधी रानडे हे
नाट्यसंगीताची मेजवानी रसिकांना देणार आहेत. वादनाची साथ महेश खानोलकर, नीला सोहोनी आणि
धनंजय पुराणिक करणार असून, कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार आहेत. नाट्यसंगीताच्या सुवर्ण
परंपरेचा आस्वाद घेण्याची ही रसिकांसाठी एक अनोखी संधी ठरणार आहे.

IPRoyal Pawns