मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट
मुंबई १ ऑगस्ट -मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक / अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात माध्यमकर्मी यांची एक महत्त्वाची बैठक भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे आयोजित केली होती. या बैठकीत मंदार जोशी ( तारांगण), सौम्या बाजपेयी (हिंदुस्तान टाइम्स ) राजेश शिरभाते ( गावकरी) संतोष भिंगार्डे ( सकाळ) श्रेयस सावंत (पुढारी ) चेतन काशीकर( न्यूज नेशन) निलेश अडसूळ (लोकमत फिल्मी ) सुरज खरटमल ( रत्न मराठी) चित्रली चौगुले ( इट्स मज्जा) इत्यादी पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी उपस्थित होते.
मनोरंजन क्षेत्रातील विविध घडामोडी तसेच भविष्यात मनोरंजन क्षेत्राचा होणारा विकास याबरोबरच पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याचे महत्त्वाचे काही प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.
या बैठकीला भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष विजय हरगुडे, भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित, चित्रपट आघाडीचे सरचिटणीस राकेश ठाकूर तसेच हेनल मेहता ही मंडळी उपस्थित होती.
सरकारच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि अनुदान समितीमध्ये कमीत कमी दोन पत्रकारांचा समावेश करण्यात यावा, बरेचसे पत्रकार मुंबई बाहेर राहात आहेत. त्यांना मुंबईत सरकारी कोट्यातून घर किंवा एखादा भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सरकारतर्फे आमंत्रण, मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना एखादा पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे आदी मागण्यांचे एक निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले. हे सगळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिले.
समीर दीक्षित म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची बैठक झालेली नव्हती आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या प्रश्नांची व्यक्तिगत नोंद घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.