त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे गं…’ किंवा ‘सावळाच रंग तुझा… ‘ ही माणिक वर्मा यांनी गायलेली गाणी आजही ऐकायला तितकीच गोड आणि अवीट वाटतात. सावळ्या रंगाची प्रतिभा अगदी योग्य शब्दात वणिर्ली आहे. अनेक साहित्यात दिमाखाने झळकलेला हा सावळा रंग खऱ्या आयुष्यात मात्र तितक्याच प्रकर्षाने नाकारला गेला किंबहुना आजही नाकारला जातोय.
सुंदर दिसणं ही प्रत्येकाची स्वाभाविक भावना आहे, पण सौंदर्याचा संबंध थेट गोरेपणाशी जोडला जातो. याच भावनेतून मग जन्माला येणारं मूल गोरंच हवं इथपासून लग्नविषयक जाहिरातींमध्येही ‘गोरी बायको हवी’ असं ठामपणे सांगितलं जातं. पण सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि मनाचं सौंदर्य चेहऱ्यावर उमटल्याखेरीज रहात नाही. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून हाच विचार मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वर्णभेदाविषयी असलेली मानसिकता बदलायला ही मालिका भाग पाडेल. या मालिकेतील नायिका म्हणजेच दिपाच्या वेगळेपणाच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल.
स्वत:वर भरभरुन प्रेम करणारी दिपा तिच्या गुणविशेषांमुळे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. दिपाचा हाच वेगळेपणा ‘सौंदर्य म्हणजे गोरेपणा’ ही भ्रामक समजूत असल्याची जाणीव करुन देतो. सौंदर्याची नेमकी व्याख्या काय याचा नव्याने विचार करायला भाग पाडतो. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि अतुल केतकर यांच्या राईट क्लिक प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे.
या मालिकेच्या वेगळेपणाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘नाही म्हण्टलं तरी आपल्या समाजात वर्णभेद हा आहेच. मालिकेची गोष्ट जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा वाटलं एक सुंदर संवेदनशील कथा सादर करता येईल. लव्हस्टोरीसोबतच रिलेटेबल ड्रामा मांडण्याचा आणि काही ठोकताळे खोडण्याचा प्रयत्न आहे. हल्लीची पीढी याबाबतीत स्वत:ला अजिबात कमी लेखत नाही. त्यामुळेच तर कोणतीही गोष्ट त्यांना प्रगतीपासून थांबवू शकत नाही.
तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’ ३० ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.