….. आणि पन्नास वर्षानंतर ‘गब्बर’ मरणार
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला, इतिहासातील सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल पन्नास वर्षे झाली आहेत मात्र आजही या चित्रपटाचे प्रेक्षकांच्या मनावर गारुड कायम आहे. गब्बर सिंगचा अरे ओ सांबा, ठाकूरचा ये हात नही फांसी का फंदा है, बसंतीचे चल छनो आज तेरी बसंती का इज्जत का सवाल है, आणि सर्वात महत्त्वाचे जय-वीरू हे पात्रे आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
मात्र, या चित्रपटाचा मूळ क्लायमॅक्स हा वेगळाच होता.जेव्हा रमेश सिप्पी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, तेव्हा चित्रपटाचा शेवट कसा व्हावा हा विचार करून ठेवला होता. खलनायक गब्बर सिंहचा मृत्यू ठाकुरच्या हातांनी व्हावा, म्हणजे ठाकुर आपल्या परिवाराचा बदला घेऊ शकेल. पण वितरकांच्या सल्ल्यानंतर क्लायमॅक्स बदलण्यात आला आणि चित्रपटात दाखवण्यात आले की, गब्बरला पोलिस अटक करतात. पण, रमेश सिप्पी यांनी एंडिंगचे दोन व्हर्जन शूट केले होते इतक्या वर्षानंतर आता पहिल्यांदाच ‘शोले’चा ओरिजिनल एंड प्रेक्षकांसमोर आणला जाणार आहे जो आता पहिल्यांदा रिलीज होईल.
इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ सिडनी 2025 हा 9 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केला जाणार आहे व या तीन दिवसीय फेस्टिवल मध्ये रिस्टोर केलेला ‘शोले’ चित्रपटाचा प्रीमियरही होणार आहे आणि तोही ऑरिजिनल वर्जन आणि स्पेशल क्लायमॅक्सह दाखवला जाणार आहे.
































