चौक- नुसता जाळ
सचिन चिटणीस या चित्रपटाला मिळत आहेत तीन स्टार (3*)
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चौक नावाची गोष्ट आलेली असते नव्हे तो ती जगलेला असतो. त्यामागे त्याच्या कडू गोड आठवणी असतात. आताशा चौक ही संस्कृती हळूहळू लोप पावत चाललेली आपल्याला जाणवते पूर्वी गिरणी कामगारांच्या लहानश्या घरात मुलगा कमावत्या वयाचा झाला की त्याला सतत काहीतरी काम कर असा पिच्छा पुरवला जायचा, शेवटी या सततच्या बोलण्याला कंटाळून मुलगा चौकात जाऊन बसायचा तिथे त्याच्या सारखीच मुले अगोदरच बसलेली असायची त्यांच्यात मैत्री होऊन पुढे याच चौकातून आज पर्यंत कित्येक राजकारणी, समाजसेवक आपण घडलेले बघावयास मिळालेले आहेत तर गुंडही बनलेली मुलं आपण पहिली आहेत.
याच गोष्टीचा धागा पकडत दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड यांनी हा चित्रपट केलाय. लेखक, संवाद, कथा, पटकथा सुद्धा त्यांचीच आहे तर निर्माते आहेत दिलीप लालासाहेब पाटील (तात्या).
राजकारणी लोक या चौकातील मुलांचा आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेतात हे प्रामुख्याने या चित्रपटात मांडले आहे. दोन वेळा क्षुल्लक मतांनी पडलेला नागरसेवक अण्णा (प्रवीण तरडे) तर त्याच्या विरुद्ध असलेला टायगर (उपेंद्र लिमये) व त्याचा छपरी भाऊ बाल्या (अक्षय टंकसाळे), गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणाचा गणपती पुढे जाणार यावरून झालेली सुरुवात बाल्याच्या खुनामध्ये होते. मंडळाचा अध्यक्ष (शुभंकर एकबोटे) व त्याचा मित्र सनी (किरण गायकवाड) या दोघांपैकी कोणीतरी एकाने आपल्या भावाचा खून केलाय याची टीप टायगरला लागते यात अध्यक्षाचा खून होतो व या खुनाचे राजकारण करत अण्णा आपली इमेज चांगली करत नगरसेवक पदासाठी पुन्हा उभा राहतो यात तो सनीची मदत घेतो सनी अण्णाला निवडून आणतो मात्र शेवटी सनीचे काय होते. राजकारणात असे कित्येक सनी चा उपयोग करून त्यांना बाजूला केले जाते हेच येथेही घडते का?
या व अश्या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी चौक बघावयास हवा.
आपल्या दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असूनही देवेंद्र गायकवाड यांनी चित्रपटावर चांगली पकड ठेवली आहे. मात्र उत्तरार्धात काही प्रसंग अर्धवट सोडून दिल्याचे जाणवते तर जाही प्रसंगात गोंधळ उडाल्याचेही जाणवते. मारामारीचे सिन अफलातून झाले आहेत मात्र या चित्रपटात हिरो म्हणजे किरण गायकवाड च्या ऐवजी व्हिलन उपेंद्र लिमयेच भाव खाऊन जातो. उपेंद्रने आपला रोल उत्तम वठवला आहे. अण्णा बनलेला प्रवीण तरडे ने संधीसाधू राजकारणी मस्त रंगवला असून मजा आणली आहे.
किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.
मुळशी पॅटर्न ची आठवण करून देणारा चौक बघावयास हरकत नाही.