चिंता नको, धनुष्यबाण चिन्ह आपलेच – उद्धव ठाकरे
चिंता करू नका, धनुष्यबाण चिन्ह आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. त्यामुळे नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही. धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि राहील, आमदार जाऊ शकतात, परंतु पक्ष जात नसतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अनेक दिवसांनी तुमचे मातोश्रीत स्वागत, सन्मानाने
बोलावले, तुम्ही ही आलात, भविष्यात सुद्दा हीच अपेक्षा आहे. एक दोन दिवसांनी आषाढी एकादशीआहे, काही जण आज उद्याच दर्शन घेतील. मी नंतर जाऊन नक्कीच दर्शन घेईन. गेले ८-१० दिवस मातोश्रीला लोंढेच्या लोंढे भेटावयास येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु आहेत, शिवसेनाप्रमुखांचे एक वाक्य नेहमी मला आठवते ‘माशांच्या डोळ्यातले अश्रु कुणाला दिसत नाही.’
भावना आणि दुः ख मला ही आहे, परंतु मला शिवसैनिकांवरील ताण वाढवायचा नाही. साधी माणसं जो पर्यंत शिवसेनेसोबत आहेत, तोपर्यंत शिवसेनेला धोका नाही. आमच्यावर विकृत टीका करणाऱ्यावर बोलताना दातखिळी बसली होती का? त्यावेळी गप्प का होता, असा सवाल त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केला. त्रास देणाऱ्या सोबत सत्ता स्थापन केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला, मग तुमचे प्रेम खरं की खोटं, असे ते म्हणाले. आमदार पळून गेले म्हणून पक्ष संपत
नसतो. विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरील जनतेचा पक्ष यामध्ये फरक असतो, राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ द्या, आमचे चुकले असेल, तर जनता दाखवून देईल, असेही ते म्हणाले.
अडीच वर्षापूर्वी आम्ही जे म्हणत होतो. तसे झाले असते तर, आज आज सन्मानाने झाले असते, शिवसेनेबाबत जे काही सुरू आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईल. न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे, राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार दौपद्री मुरमू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या सर्व खासदारांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील गदारोळ संपल्यानंतर पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला या, अशी विनंती वारकऱ्यांनी केली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.