चेहऱ्या बरोबर मनावरही झालेला आघात मांडणारा ‘आठवा रंग प्रेमाचा’
“तू मला मिळाली नाहीस तर मी दुसऱ्याला सुद्धा तुला मिळू देणार नाही” अश्या विकृत मनोवृत्तीचे प्रेमी आपल्याला समजात दिसून येतात प्रसंगी ते आपल्या प्रेमाला विद्रुप करायलाही मागे पुढे पहात नाहीत. आणि त्यामुळेच अशा विकृतीच्या बळी ठरलेल्या अनेक तरुणींना त्यांचा काहीही दोष नसतांना तोंड लपवून फिरावे लागते समाजाचा सुद्धा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो.
दिग्दर्शिका खुशबू सिन्हा यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या आपल्या चित्रपटात कुठेही अतिशयोक्ती वा भडकपणा न दाखवता चित्रपट मांडला आहे. त्या बद्दल त्यांचे कौतुक.
एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची मुलगी लग्न करून परदेशी जाण्याचं स्वप्न पहात असते मात्र तिच्या तोंडावर कोणीतरी अॅसिड फेकतं आणि तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना दिग्दर्शक धक्का देतो यावरून पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पना प्रेक्षकांना येते, अखेरीस पुन्हा धक्कादायक सत्य समोर येतं आणि आश्चर्यकारक शेवट पहायला मिळतो.
सादरीकरणात काही त्रुटी राहिल्याचं जाणवतं असले तरी पटकथेची मांडणी चांगली करण्यात आली असून अखेरपर्यंत रहस्य उलगडू न देण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाल्या आहेत. गाण्यांमधील लोकेशन्स, कॅास्च्युम, कॅमेरावर्क, संकलन चांगलं आहे. जळलेला चेहरा टप्प्याटप्प्यानं सुधारल्याचं मेकअपच्या माध्यमातून अचूक दाखवण्यात आलं आहे.
अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या अनेक तरुणींच्या मनातील भावना रिंकू राजगुरुला सादर करायच्या होत्या. तिनं आपल्या परीनं चांगलं काम केलं आहे. मकरंद देशपांडेने सुद्धा वडील व पोलीस अधिकारी या दोन भूमिकांना चांगला न्याय दिला आहे.
हा वास्तवदर्शी चित्रपट असल्याने तो त्या दृष्टिकोनातून बघितला तर याचा नक्कीच प्रेक्षकांवर प्रभाव पडेल अन्यथा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघावयास गेलेला प्रेक्षक मात्र निराश होईल. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणींच्या चेहऱ्यावरीलच नव्हे तर त्यांच्या मनावरही झालेला आघात यात आपल्याला ठळकपणे पाहावयास मिळतो.
सदरहू चित्रपट पाहून समाजातील विकृत मनोवृत्ती असलेला एखाद्या तरी माणसाने आपला निर्णय बदलला तरी या चित्रपटाचे सार्थक झाले असे समजावे पण त्या साठी हा चित्रपट एकदा तरी पहावयास हवा.
कलाकार : रिंकू राजगरू, मकरंद देशपांडे, विशाल आनंद, आशिष वारंग, कांचन जाधव, तुषार कावले, अदिती पाटीलदिग्दर्शक : खुशबू सिन्हानिर्माते : समीर कर्णिक, आशिष भालेराव, राकेश राऊत