‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ च्या लोगोचे महेश कोठारेंच्या हस्ते अनावरण

एखाद्या भयावह स्वप्नाप्रमाणे वाटावे असे २०२० वर्ष संपता-संपता मराठी सिनेसृष्टी आणि रसिकांसाठी एक गोड बातमी घेऊन आले आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनच्या वातावरणामुळे आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने आणि उमेदीने पुन्हा गगनभरारी घेत मराठीची पताका सातासमुद्रापार फडकवण्यासाठी मराठी सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. मराठी सिनेसृष्टीत जणू नवचैतन्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. नवीन वर्षाची सुरुवात काहीशा नव्या शैलीत व्हावी या उद्देशाने दुबईमध्ये ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच या सोहळ्याच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.

२० ते २३ जानेवारी २०२१ या दरम्यान दुबईमध्ये ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका सहभागी होणार आहेत. देश-विदेशातील मान्यवर पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या बहुचर्चित आणि अनोख्या सिनेसोहळ्याचा लोगो ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. याप्रसंगी सोहळ्याचे आयोजक सचिन कटारनवरे हेही उपस्थित होते. यावेळी कोठारे यांनी दुबईत साजऱ्या होणाऱ्या या सिनेमहोत्सवाबाबत उत्सुकता आणि आनंद व्यक्त केला. या फेस्टच्या आयोजनाबाबतची माहिती त्यांनी सचिन कटारनवरे यांच्याकडून जाणून घेतली. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ हे मराठी सिनेसृष्टीसाठी सकारात्मक पाऊल असून, २०२१ वर्ष मराठी सिनेमांसाठी उत्साहवर्धक ठरेल, अशी आशा कोठारे यांनी व्यक्त करत ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

५जी इंटरनॅशनल’च्या वतीने आयोजित ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चे वैशिष्ट्य म्हणजे रसिक ज्यांची आतुरतेने वाट पहात आहेत अशा निवडक आगामी मराठी सिनेमांचे प्रीमियर शो इथे संपन्न होणार आहेत. याखेरीज काही मराठी सिनेमांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns