फिलिपिन्समध्ये सापडले १० हजार वर्षे जुने त्रिशूल आणि वज्र – संशोधक सैयद शमीर हुसेन यांचे मुंबईत अनावरण
मुंबई : सनातन धर्माशी संबंधित अत्यंत प्राचीन मानल्या जाणाऱ्या त्रिशूल आणि वज्र या दोन दुर्मिळ कलाकृती फिलिपिन्समध्ये खननादरम्यान सापडल्याचा दावा संशोधक आणि उद्योजक सैयद शमीर हुसेन यांनी केला आहे. या कलाकृतींचे अनावरण मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या प्रसंगी सैयद शमीर हुसेन यांनी भगवान शिवाशी संबंधित त्रिशूल आणि भगवान इंद्राशी संबंधित वज्र (वज्रायुध) याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ, संशोधन आणि संबंधित दस्तऐवज सादर केले. त्यांच्या मते, या कलाकृतींपैकी त्रिशूल सुमारे १० हजार वर्षे जुना असून वज्र सुमारे ३ हजार वर्षे जुना आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ. वी. जयराज (वैज्ञानिक व कला इतिहासकार), दीपेश मेहता (वकील व सॉलिसिटर, यू.के.), नितेश मनोपारा (व्यवसायी) आणि ममता राजेश उताले (उद्योजिका) यांची उपस्थिती होती.
सैयद शमीर हुसेन यांनी सांगितले की, २०१२ पासून ते फिलिपिन्समध्ये स्थानिकांसोबत काम करत होते. २०१५ मध्ये खननादरम्यान काही वेगळे आढळल्याने त्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले आणि तेथे या दुर्मिळ वस्तू सापडल्या. २०१६ मध्ये त्यांनी या कलाकृती भारतात आणल्या.
त्यांनी पुढे सांगितले की, या शोधानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. या कलाकृतींच्या प्रामाणिकतेसंदर्भात त्यांनी विविध दस्तऐवज सादर केले असून संबंधित अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या दुर्मिळ वस्तूंच्या प्रस्तावित लिलावाबाबतही त्यांनी माहिती दिली. १० जून रोजी होणाऱ्या लिलावात त्रिशूलाची प्रारंभिक किंमत ५०० कोटी रुपये तर वज्राची २५० कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. लिलावातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा त्यांचा मानस असून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
सैयद शमीर हुसेन यांनी सांगितले की, “या संशोधनासाठी मी माझी १० वर्षे दिली आहेत. इतक्या मोठ्या जगात मला या दुर्मिळ कलाकृती सापडणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
या शोधामुळे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून या दाव्यांची पुढील शास्त्रीय पडताळणी होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

































