सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
*नीना कुळकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान*
नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व नाट्य कलावंतांच्या सहकार्याने केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नटराजाच्या सेवेसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंतांचा हा सन्मान अभिमानाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. कै.गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनाप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळयात ते बोलत होते. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हा सोहळा सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना शासनाच्या मदतीने सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करण्याचं आश्वासनही आशिष शेलार यांनी यावेळी दिले.
ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र आणि रोख रक्कम रु.५१,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कारानंतर बोलताना ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्येष्ठ लेखक पु.ल. देशपांडे आणि छोटा गंधर्व या दोघांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून मी ही संगीत नाट्यसेवा केली. त्याचे फलित म्हणजे आजचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा हा ‘जीवनगौरव पुरस्कार’. या पुरस्काराचा मी मनापासून स्वीकार करत सर्वांचे मनापासून आभार मानतो. संगीत नाटकाच्या विकासासाठी शासनाच्या सहकार्याची गरज ही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
‘नाट्यसेवेत कार्यरत असताना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराची खुमारी काही औरच असते’ असं सांगताना,‘या वाटचालीत मिळालेले समाधान आणि भाग्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी केले’. या पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तसेच गुरु म्हणून लाभलेल्या प. सत्यदेव दुबे, विजया मेहता तसेच मार्गदर्शक ठरलेल्या विमलताई राऊत, डॉ. काशिनाथ घाणेकर, नाट्यसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि कुटुंबाचे आभार नीना कुळकर्णी यांनी यावेळी मानले. नाट्यसेवा हा आपला श्वास आहे तो न सोडण्याचा पती कै. दिलीप कुळकर्णी यांचा सल्ला हा जीवनगौरव पुरस्कार घेताना प्रकर्षाने आठवतो, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नाट्य परिषदेच्यावतीने लोककलावंतांना मदत, नाट्यसंस्थच्या प्रवासी बससाठी आरटीओ नियमावलीत बदल, नाट्यगृहांचं योग्य तो सांस्कृतिक व्यवस्थापन आदि मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना यावेळी दिले.
































