पोटापाण्यासाठी मी टॅक्सी चालवणार होतो त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स देखील काढून ठेवले होते – अमिताभ बच्चन

पोटापाण्यासाठी मी टॅक्सी चालवणार होतो त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स देखील काढून ठेवले होते – अमिताभ बच्चन

संघर्षांपासून स्टारडमपर्यंत: कौन बनेगा करोडपती – ज्ञान का रजत महोत्सवमध्ये अमिताभ बच्चनने शेअर केल्या ‘जंजीर’च्या आठवणी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो एक लक्षणीय माइलस्टोन साजरा करत आहे- दैदीप्यमान 25 वर्षे- ज्ञानाची, स्वप्ने खरी करण्याची आणि जीवन पालटून टाकणाऱ्या क्षणांची! हा भव्य आनंद सोहळा ‘ज्ञान का रजत महोत्सव’ 20 जानेवारीपासून सुरू होत आहे, जो सुखद आठवणी, उत्साह आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला असेल.

हा प्रसंग आणखी विशेष केला, तो कठुआहून आलेल्या विनय गुप्ता या स्पर्धकाने. आपल्या गावाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणाऱ्या विनय गुप्ताने सांगितले की, त्याच्या गावातून KBC मध्ये आलेला तो पहिला स्पर्धक आहे. अभिमानाने आणि दृढतेने KBC च्या हॉटसीटवर विराजमान झालेला विनय KBC मध्ये त्याचे येणे ही केवळ त्याची स्वतःची स्वप्ने साकार करण्याची नाही, तर आपल्या गावकऱ्यांना मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी परिश्रम करण्याची प्रेरणा देण्याची एक संधी म्हणून बघत होता. या खेळादरम्यान अमिताभ बच्चनचा फॅन असणाऱ्या विनयने त्यांना ‘जंजीर’ चित्रपटातील प्रसिद्ध संवाद म्हणण्याचा आग्रह केला. त्याला प्रतिसाद देताना एक हृदयस्पर्शी आठवण शेअर करत श्री. बच्चन म्हणाले, “मी दोन तीन चित्रपटांत काम केले होते, पण त्यात मला यश आले नव्हते. त्यामुळे मी हताश झालो होतो. मुंबईला येण्याअगोदर मी कोलकाता येथे नोकरी करत होतो, जिकडे मी फक्त 400-500 रु. महिना कमवत होतो. पण जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा इकडे जम बसवण्याचा निर्धार करून मी आलो होतो. मी विचार केला की, जर मला चित्रपट मिळाला नाही, तर मी टॅक्सी चालवीन. मी माझा ड्रायव्हिंग लायसन्स देखील तयार ठेवला होता. पण, मला काम मिळाले. अब्बास साब यांनी मला पहिला ब्रेक दिला. जंजीर चित्रपट सलीम-जावेद यांनी लिहिला होता, जो माझ्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. त्यावेळी राजेश खन्ना हा भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार होता. काय त्याचा ऑरा होता, काय फॉलोइंग होते.. त्याला लोकांनी इतके डोक्यावर घेतले होते की, तो आपल्या गाडीतून आला की महिला त्याच्या कारच्या टायरला लागलेली धूळ आशीर्वाद म्हणून मस्तकी लावत असत. मी तर तेव्हा कोणीच नव्हतो. पण तरीही सलीम जावेद माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ही कथा देऊ केली. ही भूमिका मला मिळेल अशी मला अपेक्षा नव्हती पण ती मिळाली. अशा प्रकारे ‘जंजीर’ चित्रपट मला मिळाला.”

जेव्हा बिग बींनी जावेद साब यांना विचारले की, त्यांनी त्याचे आधीचे काम पाहिले आहे का? तेव्हा ते म्हणाले होते, “होय, मी पाहिले आहेत.” बिग बी पुढे सांगतात, “जावेद साबनी मला सांगितले की, माझ्या बॉम्बे टू गोवा चित्रपटात एक असे दृश्य आहे की मी एका हॉटेलात बसलो आहे आणि त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा येऊन मला थप्पड मारतो. त्या दृश्यात आमच्यात लगेच मारामारी सुरू होणे अपेक्षित होते. पण तसे न करता मी नुसता उठून उभा राहतो आणि मी खात असलेला सँडविच खाणे चालू ठेवतो. ते दृश्य पाहून जावेद साब यांना विश्वास वाटला होता की मी ‘जंजीर’ची भूमिका पेलू शकेन.”

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’ चित्रपटातील आपला प्रसिद्ध संवाद सादर केला, “जब तक बैठने को न कहा जाए, सीधी तरह खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.” त्यानंतर हसत हसत बिग बी म्हणाले, “तो माझा कामाचा पहिला दिवस होता आणि हा संवाद मला प्राण सरांसमोर बोलायचा होता, जे स्वतः अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत. त्यांना या ओळी ऐकवणे मला आधी थोडे जड गेले, पण त्यांनी मला धीर दिला आणि विना-संकोच संवाद म्हणायला सांगितले.”

हे अविस्मरणीय क्षण बघायला विसरू नका, 20 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या “कौन बनेगा करोडपती – ज्ञान का रजत महोत्सव”मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns