मात्र या वेळेस नथुरामच्या निशाण्यावर नथुराम
“१५० वर्षाच्या मराठी रंगभूमीच्या कारकिर्दीत अशी घटना घडली नसून, अतृप्त आत्मा असलेल्या शरद पोंक्षे यांनी ती घडवली आहे याचे मला दुःख आहे” निर्माता उदय धुरत यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाने शरद पोंक्षे यांना प्रसिद्धी दिली त्याच पोंक्षेनी उदय धुरतांच्या विरुद्ध जाऊन ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ चे ५० प्रयोग करायचे जाहीर केल्याने व तशी कोणतीही परवानगी धुरतांकडून न घेतल्याने, धुरातांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा या उद्देशाने पोंक्षेना ७२ तासाची कायदेशीर नोटीस पाठवली असून, दोन गोष्टी पोंक्षेनी त्यांना द्याव्यात असे या नोटिशीत म्हटले आहे.
त्या दोन गोष्टी म्हणजे एकतर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाची संहिता द्यावी व दुसरे म्हणजे नाटकाचे नाव बदलावे. कारण या दोन्ही गोष्टी धुरतांच्या कडे परवानगीने आहेत.
उदय धुरत पुढे म्हणतात “या माणसाने ( पोंक्षे ) या नाटकाचे आठशेहून जास्ती प्रयोग केले. एके दिवशी हा माणूस माझ्याकडे आला व मला म्हणाला हे नाटक मला चालवायला द्या त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्काच बसला या माणसाला मोठा केला मी, या नाटकाने आणि तोच माणूस हे नाटक मला चालवायला द्या असे म्हणतो त्याला मी त्यावेळेस नकार दिला त्यानंतर हा माणूस मला मानसिक त्रास देऊ लागला. त्यानंतर मी हे नाटक बंद करायचे ठरवले.
त्यानंतर या नाटकावर बंदी आली. २००१ साली ही बंदी उठल्यानंतर या नाटकाचे मूळ लेखक प्रदीप दळवी यांची मी भेट घेऊन हे नाटक पुन्हा सुरू करूयात असे सांगितले त्यावेळेस प्रदीप दळवींनी मला एक अट घातली हे नाटक पुन्हा सुरू करूयात, मात्र या नाटकात शरद पोंक्षे असणार नाही, तर आणि तरच हे नाटक आपण पुन्हा सुरू करूयात. मी त्याला नाटक चालवायला दिलं नाही हा राग त्याने मनात ठेवून या सगळ्या उलाढाली सुरू केल्या आहेत.
मला विनय आपटे व प्रदीप दळवी यांची माफी मागायची आहे, का तर त्यांनी मला त्यावेळेस सांगितले होते या माणसाला या नाटकात घेऊ नका मात्र मी ऐकलं नाही त्यामुळे मला त्यांची माफी मागायची आहे त्या दोघांचं त्यावेळेस ऐकलं असतं तर आज मला ही न्यायालयीन लढाई लढायची वेळ आली नसती.
नोव्हेंबरमध्ये नव्या कलाकारांच्या संचात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे मूळ नाटक रंगभूमीवर येणार असून त्यात नथुरामाची भूमिका सौरभ गोखले करणार आहे.
२०१७-१८ मध्ये हे नाटक बंद झाले तेव्हा पोंक्षे यांनी मला नाटकाचे पुनर्लेखन करण्याची ऑफर दिली, पण मी नकार दिला होता. पण प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या या उत्कृष्ट नाटकात मला बदल करायचा नव्हता. आता हे नाटक २५ वर्षांच्या काळानुरूप त्यात काही शब्दांचा बदल करण्यात येणार असून शुभारंभाचा ८१७ वा प्रयोग नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक विवेक आपटे म्हणाले.
दरम्यान शरद पोंक्षे यांनी ७ ऑक्टोबरला या नाटकाचा पहिला प्रयोग होईल असे जाहीर केले आहे. पोंक्षे यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.