*विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅण्टीक अंदाज*
हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत शिरीष राणे १३ ऑक्टोबरला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विजय पाटकर यांनी प्रोफेसर पाटकर तर सुरेखा कुडची यांनी प्रोफेसर मेरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात कश्यप परुळेकर, वीणा जगताप, स्मिता गोंदकर, चिराग पाटील, प्रदीप वेलणकर, स्मिता जयकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग हे कलाकार दिसणार आहेत.
‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली-उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.