टेलिव्हिजन वरील तिच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक आणि चाहते सुखावले आहेत. ती म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा झी युवावरील आगामी मालिका ‘तुझं माझं जमतंय’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हि मालिका ४ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षक पाहू शकतील. प्रेक्षक अपूर्वाच्या शेवंता या व्यक्तिरेखेला अजूनही विसरू शकले नाही आहेत पण आता त्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे अपूर्वाच्या पम्मी या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घ्यायची.
तिच्या पम्मी या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, “पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत. कारण शेवंता या व्यक्तिरेखेचं एक उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी नाईक कुटुंबाला तिच्या तालावर नाचवत होती. पण पम्मी हि एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. तिच्या पासून कोणालाच धोका नाहीये. पम्मी हि तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते. शेवंता तशी नव्हती. शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये, पम्मी खूप श्रीमंत आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा दुबईमध्ये असतो. तिच्या कडे सर्व काही आहे. ती अभिनय क्षेत्रात लवकरच खूप मोठं नाव करणार आहे असं तिला वाटतं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणणार आहे.”