शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव तसेच शिवसेनेच्या आयटी सेलची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे वरूण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्यात असलेले संबंध तसेच दोघांमधल्या संभाषणाची NIA मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केल्या नंतर त्यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन असून कोणत्याही तपास यंत्रणेच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवावेत अन्यथा चुकीच्या आरोपांबाबत माफी न मागितल्यास सात दिवसांच्या कालावधीनंतर कायदेशीर कारवाईला सामोर जाण्यासाठी त्यांनी तयार राहावं. असे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “आपण सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित कुटुंबातून आलो आहोत, मला राजकारणाची आवड असल्याने मी युवासेनेचं, शिवसेनेचं काम करतो. आज जे काही घाणेरडे आरोप माझ्यावर करण्यात आले, अशी काम करण्याची माझी इच्छा नाही आणि माझ्या हातून तसं घडणारही नाही. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटंबाच्या पार्श्वभूमीबाबत सारं सर्वश्रुत आहेच. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो किंवा नंतर त्यांच्यावर दाखल झालेले खून, अपहरण, खंडणीसारखे गंभीर आरोप असोत. या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर देखील आहे” असं म्हणत सरदेसाई यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचे ठासून अधोरेखीत केले.