मराठी भाषेच्या दैदिप्यमान साहित्यिक परंपरेला आजच्या युवापिढीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘रंगवैखरी’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या, यंदाच्या ‘कथारंग’ या पर्वाला महाविद्यालयांचा दणदणीत प्रतिसाद मिळाला आहे.
यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून आधीच्या दोन पर्वांच्या तुलनेत या पर्वाला अधिक संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत,अल्पावधीतच मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद हा या स्पर्धेचा उद्देश सफल करणारा आहे. या प्रतिसादाबद्द्ल राज्य मराठी विकास संस्थेने स्पर्धकांचे विशेष आभार मानले आहेत. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान ही प्राथमिक फेरी पार पडेल.
२२ डिसेंबरला मुंबईच्या पु.ल देशपांडे कला अकादमी तर २३ डिसेंबरला अमरावतीच्या टाऊन हॉल आणि रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात,२४ डिसेंबरला जळगावच्या मायादेवी नगरातल्या रोटरी भवन हॉल आणि बेळगावच्या लोकमान्य रंगमंदिरात,२५ डिसेंबरला नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारक तसेच कोल्हापूरच्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात तर २६ डिसेंबरला अहमदनगरच्या माऊली सभागृह आणि पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड इथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ही प्राथमिक फेरी पार पडेल.
रंगवैखरीच्या तिसऱ्या पर्वासाठी ” कथारंग ” हा विषय देण्यात आला आहे. या पर्वात संस्थेने निवडलेल्या चिं. वि. जोशी,दिवाकर कृष्ण,बी. रघुनाथ,दि. बा. मोकाशी,जी. ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ,शंकरराव खरात,नारायण धारप, उद्धव शेळके, शंकर पाटील,द. मा. मिरासदार,रा. रं. बोराडे,बाबुराव बागूल, रणजीत देसाई, मधु मंगेश कर्णिक, वामन होवाळ,भारत सासणे, राजन खान,सतिश तांबे. या कथाकारांच्या तर कथालेखिका विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, प्रतिमा इंगोले, उर्मिला पवार या पंचवीसपैकी एका साहित्यिकाच्या कथेवर वा कथासाहित्यावर आधारित नवीन नाट्यसंहिता विद्यार्थ्यांनी लिहून–दिग्दर्शित करून, तिचे संगीत, नृत्य, चित्र, शिल्प यांसह ४० मिनिटांचे नाट्याविष्कार सादरीकरण करायचे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: rangavaikhari@gmail.com https://sites.google.com/site/rmvsrangavaikhari https://www.facebook.com/marathikalabimb