बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या आगामी मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे.
‘आटपाडी नाईट्स’ च्या टीजर मध्ये वसंत बापूसाहेब खाटमोडे (अभिनेता प्रणव रावराणे) हा युवक आपल्या मित्रांसोबत एका ज्योतिषाला आपला हात दाखवतोय, त्यावर तो ज्योतिष वसंताचा विवाह येत्या २० दिवसात होण्याचा बेत असल्याचे सांगतो. तर दुसरीकडे अभिनेत्री सायली संजीवची एंट्री होते आणि ती प्रणवला ‘आज बारीक दिसताय’ म्हणते यावर ‘आपल्या प्रेमाचा माणूस आपल्याला हमेशा बारीकचं दिसतो’ असं उत्तर तो देतो. तर ‘पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ हे ज्योतिषाचे वाक्य या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारे आहे.
मायदेश मीडिया निर्मित ‘आटपाडी नाईट्स’ च्या टीजर मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, छाया कदम, संजय कुलकर्णी, नितिन दांडुके, विठ्ठल काळे आदी कलाकार दिसतात, चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत? हे लवकरच समजेल. या चित्रपटाला विजय गावंडे, सिद्धार्थ धुकटे यांचे संगीत लाभले असून नारायण पुरी, कमलेश कुलकर्णी यांची गीते आहेत. छायांकन नागराज दिवाकर, विरधवल पाटील यांनी केले आहे. वेशभूषा नामदेव वाघमारे, रंगभूषा महेश बाराटे यांची आहे तर संदीप इनामके कलादिग्दर्शक असून नीलेश गावंड यांनी संकलन केले आहे.
दरम्यान, ‘आटपाडी नाईट्स’च्या टीजर बरोबरच पहिल्या पोस्टरचीही सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते. या पोस्टर मध्ये एक सुंदर सजावट केलेले हिरव्या रंगाचे बंद दार आहे, दाराच्या मध्यभागी शुभ विवाह लिहिलेले आहे, तसेच दारावर ‘डू नॉट डिस्टर्ब’ चा टॅग लावलेला आहे. यामुळे या बंददाराआड नेमकी काय कथा दडली आहे? या प्रश्नाचे उत्तर येत्या २७ डिसेंबर रोजी मिळणार आहे.