***
पानिपतची लढाई ही मराठी साम्राज्याच्या कपाळावरील एक भळभळणारी जखम आहे असे म्हटले तर त्यात काही वावग ठरणार नाही. समोरून शत्रू येत असतांना भ्याडपणे पळून न जाता त्यांचा मुकाबला आपल्या असीम पराक्रमाने करणारे पेशव्यां बद्दल अहमद शाह अब्दाली याने सुद्धा आपल्या पत्रात पेशवांचे कौतुक केले आहे.
असा हा भव्य दिव्य चित्रपट बनवण्याचे शिवधनुष्य आशुतोष गोवरीकरांनी आपल्या खांद्यावर नुसतेच पेलले नाही तर त्याला चार चांद लावले. खुंखार अहमद शाह अब्दाली संजय दत्तने रंगवला असून यात आपल्याला संजय दत्त दिसतच नाही. इतका बेमालूमपणे त्याचा अभिनय झालाय. तर अर्जुन कपूर नेही सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत कुठेही कमतरता जाणून दिली नाही आहे. पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सॅनन उत्तम.
मराठा साम्राज्याच्या शौर्याला दाद द्यावी असा हा चित्रपट असून तो संपल्यानंतर आपल्या मनाची पकड घेतो. व्हीएफएक्स मुळे चित्रपट भव्य वाटतो. पहिला भाग थोडा मोठा झाला असून तिथे कात्री लावावयास वाव होता मात्र उत्तरार्ध गतिमान तसेच भव्य झाला आहे खास करून लढाईचे सीन्स अंगावर येतात.
‘पानिपत’मध्ये इतर कलाकार मोहनीश बहल, शरद केळकर, पद्मिनी कोल्हापुरे, नवाब शाह आणि झीनत अमनही मुख्य भूमिकेत आहेत. अजय- अतुल यांचं संगीत आहे आणि ते श्रवणीय झाले आहे.