भारतीय दंड संहिता (IPC) चे ३७५ कलम हे खूपच संवेदनशील असून काही प्रमाणात ते गुंतागुंतीचे सुद्धा आहे याच ३७५ कलमावर दिग्दर्शक अजय बहल यांनी हा चित्रपट बनवला असून दिग्दर्शन वरचा क्लास झाले हे मात्र त्यांना लेखक मनीष गुप्ता यांची जी १०० टक्के साथ मिळावयास हवी होती ती मिळाली नसल्याचे जाणवते काही वाक्य जबरदस्त आहेत मात्र हा कोर्ट रूम ड्रामा असल्याने याचे लेखन खूप टाईट व्हावयास हवे होते. या चित्रपटात निर्भया केस पासून ते मी टू प्रकरणे येतात चित्रपटाची सुरवात खूप मजबूत झाली आहे मात्र जस जसा चित्रपट पुढे सरकतो तसतशी त्याची प्रेक्षकांवरची पकड थोडी सैल होते तरीही दिग्दर्शक व कलाकारांच्या अभिनयाने चित्रपट आपणास रोखून धरतो.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहन खुराना ( राहुल भट्ट ) वर कॉस्ट्यूम डिजाइनर अंजलि दांगले (मीरा चोपड़ा) बलात्काराचा आरोप लावते, सेशन कोर्टात या केस चा निकाल लागतो व राहुल खुरानाला १० वर्षाची शिक्षा सुनावली जाते. मात्र केस हायकोर्टात येते व इथे नामवंत वकील तरुण सलूजा (अक्षय खन्ना) आरोपी रोहन खुराना तर्फे केस लढवत असतो तर अंजलि कडून सरकारी वकील हिरल गांधी (ऋचा चड्ढा) केस लढवत असते या दरम्यान दोन्ही पक्षकारांतर्फे कोर्टात साक्षी पुरावे सादर केले जातात ते काही वेळेस खोटे का खरे हेच कळत नाही, प्रेक्षक इथे चांगलाच गोंधळून जातो. पण काय एक खोटे खऱ्यावर मात करते, पण मग कोण खरे बोलत असतो व कोण खोटे,जो कायदा महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणला गेला त्याच कायद्याचा वापर एक महिला कसा हत्यारासारखा करते, याच प्रश्नावर पूर्ण चित्रपट टिकून राहिला आहे.
सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. अक्षय खन्नाने तर कमाल केली आहे, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव डोळ्यातील चमक अक्षयने खूप छान दाखवली आहे. त्यामानाने ऋचा चड्ढा त्याच्या समोर थोडी अभिनयात कमी वाटते. कृतिका देसाई आणि किशोर कदम उत्तम.
एकूणच हा एक संवेदनशील चित्रपट असून एकदा तरी नक्की बघावा.
कलाकार – अक्षय खन्ना, ऋचा चड्ढा, राहुल भट्ट, मीरा चोपड़ा, किशोर कदम….
दिग्दर्शक – अजय बहल