बोलीभाषा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सात एकांकिका…
मराठी नाट्यक्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी एकांकिका स्पर्धा म्हणजे ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’. नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेला प्रारंभ केला आणि आता त्यांच्या पश्चात त्यांची कन्या सुप्रिया चव्हाण या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. ‘सुप्रिया प्रॉडक्शन’तर्फे आयोजित या स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी अलीकडेच पार पडली आणि त्यातून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या सात एकांकिकांची अंतिम फेरी गुरुवार, २९ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. विविध बोलीभाषांतील एकांकिका पाहण्याची संधी रसिकांना यावेळी मिळणार आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘सपान’ (डॉक्टर्स थिएटर ग्रुप – माणदेशी), ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ (सृजन द क्रिएशन – मालवणी), ‘पाकळ्या’ (नक्षत्र कलामंच – खान्देशी), ‘डिझाईन’ (डॉ. टी.के.टोपे रात्र महाविद्यालय – घाटी), ‘त्यात काय!’ (एकदम कडक नाट्यसंस्था – घाटी), ‘सत्य’ (नाट्यारंभ एन.के.टी.टी. – मालवणी) आणि ‘पाकिस्तानचं यान’ (नाट्यांकुर – घाटी) या सात एकांकिका दाखल झाल्या आहेत. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना अभिनयाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. रंगकर्मी मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. आता सर्वांचे लक्ष स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे लागले आहे.































