*सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत लाँच झाला ‘उत्तर’चा ट्रेलर !*
*आता उत्सुकता १२ डिसेंबरला होणाऱ्या रिलीजची!*
सध्या ‘आईला माहीत असतं!’ या वाक्याने आणि ‘हो आई!’ या गाण्याने सगळीकडे चर्चेत असलेल्या ‘उत्तर’ या सिनेमाचा अप्रतिम ट्रेलर लॉन्च सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आणि सिनेमाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या. आई आणि मुलाच्या नात्याची आजच्या काळातील गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या प्रसंगी काजोल आणि तनुजा यांनी प्रेक्षकांना ‘आईसोबत’ किंवा ‘आईसाठी’ हा सिनेमा पाहण्याचं प्रेमळ आवाहन सुद्धा केलं.
उत्तर चित्रपटाच्या या ट्रेलरचं मुख्य वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक आई आणि मुलाला लागू होतील असे खुमासदार संवाद.
यासोबतीनेच सुंदर चित्रीकरण आणि साउंडवर केलेली विशेष मेहनत ह्या सगळ्यानेच सिनेमाच्या ट्रेलरचा परिणाम अतिशय गहिरा झाला आणि प्रत्येकाचं मन आईबद्दलच्या सुंदर भावनांनी भरून गेलेलं दिसलं.
‘उत्तर’मध्ये रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे. ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’ या सारखे महत्वाचे चित्रपट आणि ‘दोन स्पेशल’, ‘भूमिका’ सारखी क्लासिक नाटकं देणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी उत्तरमध्ये कथा, पटकथा लिखाणासोबत पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा ट्रेलरचे कौतुक करताना म्हणाल्या, ‘’या चित्रपटाचे नावच खूप महत्त्वाचे आहे. आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. हा ट्रेलर खूपच सुंदर झाला असून तो मनाला स्पर्श करणारा आहे. ट्रेलरमधून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून हा चित्रपट मी नक्कीच बघणार आहे.’’
अभिनेत्री काजोल म्हणाल्या, ‘’ मला ट्रेलर खूप आवडला. आई आणि मुलाच्या सुंदर नात्यावर आधारित हा चित्रपट असला तरी त्याला आजच्या काळातील तंत्रज्ञानाचीही जोड आहे. तंत्रज्ञानाचा नात्यावर कसा परिणाम होतो, याचे भावनिक चित्रण यात दिसतेय. खूप छान विषय यात हाताळण्यात आला आहे. मी आईसोबत लवकरात लवकर हा चित्रपट पाहाणार आहे.’’
ट्रेलरला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल क्षितिज पटवर्धन म्हणाले की, “हा सिनेमा माझंच नाही तर मराठी सिनेमाचं अनेक प्रश्नांना, शंकांना दिलेलं उत्तर आहे! आणि आईच्या प्रेमाला दिलेलं एक छोटीसं रिटर्न गिफ्ट आहे!”






























