दणक्यात साजरा करूया “घरत गणपती”
सचिन चिटणीस ⭐⭐⭐⭐
गणपती ! त्यात कोकणातील गणपती म्हणजे मराठी माणसाच्या हृदयातील ठेवाच. मराठी माणूस वर्षभर राबराब राबेल, गणपतीसाठी काहीही करून वेळ काढणार हे नक्की. चाकरमानी गणपतीत कोकणात जाणार म्हणजे जाणारच मग दुनिया इकडची तिकडे हो.
पण………… हो हा पण सध्या मध्ये आलाय मोठमोठ्या कंपन्या, त्यात मिळणारा पगार व म्हणूनच पूर्वी मिळणारी दहा दिवसांची सुट्टी आता दोन दिवसांवर आलेली, घरातील जुन्या मंडळींचा गणपती दहा दिवसच किंवा गौरी गणपती पर्यंत असावा असा आग्रह, ऑफिस मधून इतके दिवस न मिळणारी सुट्टी त्या कात्रीत सापडलेला मुंबईकर. याची होणारी चिडचिड, खर्च, वेळ याची कमतरता यातूनच पुढल्या वर्षीपासून गणपती दीड दिवसांचा ठेवूया हा उपाय त्याला झालेला ज्येष्ठांचा विरोध.
एवढे सगळे डोकं पिरगळून टाकणारा विषय मात्र लेखक दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी सुरेखपणे हाताळला आहे. कोठेही आरडाओरडा नाही, धसमुसळेपणा नाही, जसे डोंगरावरून वाहताना नदी आपल्या वाटेत आलेल्या दगडांना हळुवारपणे स्पर्श करून पुढे जाते तसे, याचे पूर्णपणे श्रेय दिग्दर्शकाला जाते तसेच मी इथे मुद्दामून नमूद करेन व दिग्दर्शकाचे अभिनंदन करीन त्यांनी हा सध्या डोकं वर काढत असलेला विषय मांडला त्याचे.
एक दोन चुका सोडल्यास चित्रपट शंभर टक्के भारी झाला आहे. ज्यांच्या घरात गणपती येतो व ज्यांच्या घरात येत नाही अशा दोघांनीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट बघावयास हवा.
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, शुभांगी लाटकर, परि तेलंग, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने, रुपेश बने, समीर खांडेकर, डॉक्टर शरद भुताडिया या सर्वांची कामे अतिशय सुंदर झालेली आहेत.
मात्र आपल्याला चकित करते ते पात्र म्हणजे माईचे हे पात्र रंगवले सुषमा देशपांडे यांनी त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक त्यांनी पूर्ण अभिनय आपल्या डोळ्यांवर वरील भावाने केला आहे. उत्तम कॅमेरा, ड्रोन कॅमेराने दाखवलेलं कोकणचा इवलासा भाग *जगात भारी*
२६ जुलै २०२४