‘जन्मवारी’ रंगभूमीवर येण्यास सज्ज…
एक अनोखा नाट्यानुभव देणारी ‘जन्मवारी’ आता रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली आहे. एका वेगळ्या प्रकारचे हे नाटक असून, या नाटकाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे. दोन काळातला दोन स्त्रियांचा प्रवास ‘जन्मवारी’ या नाटकात पाहण्यास मिळणार आहे.
अनुभवसंपन्न अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत. शुभांगी भुजबळ, अमृता मोडक व कविता जोशी यांच्याही भूमिका नाटकात आहेत. मंदार देशपांडे यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. सचिन गावकर यांनी या नाटकाचे नेपथ्य केले असून, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. ‘स्वेवन स्टुडिओज’ची निर्माती शांभवी बोरकर आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. हर्षदा संजय बोरकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. नाटकाचे सूत्रधार सुरेश भोसले आहेत. सहकलाकार आणि रंगमंच व्यवस्था पूनम सरोदे, शीतल चव्हाण, प्रविण पाचपुते, संदिप शिंगदाणे, राहुल गोरिवले, सिद्धेश साळुंके, क्षितीज सावंत, ओम गायकवाड, मयुर बने यांनी सांभाळली आहे. संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा यांच्या अभंगरचना; हर्षदा संजय बोरकर यांची गीतरचना; कविता जोशी, मंदार देशपांडे, शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांचे पार्श्वगायन या नाटकाला लाभले आहे.
हे मनुष्याच्या प्रवासाचे नाटक आहे. अभिनय, आशय, संगीत हे सर्व या नाटकात एकत्र येते. मंदार देशपांडे याचे संगीत हा या नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे आणि संगीतातून नाटकाचा आशय पोहोचवणे ही महत्त्वाची गोष्ट होती. संगीताची समर्पक साथ या नाटकाला लाभली आहे, अशा भावना लेखिका व दिग्दर्शिका हर्षदा संजय बोरकर यांनी या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या.
या नाटकातली माझी भूमिका अतिशय वेगळी आणि म्हटल्यास टपोरी प्रकारची आहे. पण इतर कुठल्या लेखक किंवा दिग्दर्शकाने मला यासाठी विचारले असते, तर कदाचित मी ही भूमिका केली नसती. परंतु ती भूमिका एका लेखिकेने लिहिलेली आहे आणि ते मला महत्त्वाचे वाटते, असे मनोगत संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले. या नाटकात मी ‘कान्होपात्रा’ रंगवत आहे. पण त्यातही तिची दोन वये मला साकारायला मिळत आहेत. वेशभूषा, रंगभूषा, केशभूषा या सगळ्या गोष्टींची माझ्या पात्राला खूप मदत होते, असे मत अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी-बोरकर हिने यावेळी मांडले.