अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने या आगीत भरच पडली आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर “कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांना मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.” असे तिला ठणकावून सांगितले आहे.
तर आता या वादात शिवसेना, मनसे पाठोपाठ महाराष्ट्र करणी सेनाही उतरली आहे. “कंगना राणौतने मुंबईची माफी नाही मागितली तर आम्ही कंगना राणौतच्या चित्रपटाचे सेट जाळून टाकू”, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अजयसिंह सेंगर यांनी दिला आहे.
“कंगनाला आमच्या रणरागिणी समज दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.” असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
“मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ह्या सर्वांवर पलटवार करताना “महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र त्यांचाच आहे ज्यांना मराठीचा अभिमान आहे. अभिमानाने सांगते मी मराठा आहे, माझं तुम्ही काय करणार?” असं उत्तर कंगनाने ट्विटरवरुन दिलं आहे.
सिनेसृष्टीच्या शंभर वर्षात मराठा अभिमानावर एकही चित्रपट बनलेला नाही. मुस्लीमांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीमध्ये मी माझे जीवन आणि सिनेकारकीर्द पणाला लावली आहे. शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या या कंत्राटदारांना विचारा, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले आहे? असं ट्वीट कंगनाने केलं आहे.
“महान वडिलांचे पूत्र होणे हे तुमचं एकमेव कर्तृत्व असू शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्यापेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम करता? आणि आता मला तिथे येण्याचा अधिकार नाही? हे तुम्ही कसे ठरवले, असा सवाल कंगनाने विचारला आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. “त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे” असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले.
कंगनाने मुंबईला POK ची उपमा दिल्याने मुंबईसह महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.
त्यातच कंगनाने आगीत तेल ओतत “मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मी मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान दिलं. यालाच उत्तर म्हणून “मुंबई पोलिसांचा अपमान केलेला चालणार नाही. मी कोणालाही पोकळ धमक्या देत नाही. मी ॲक्शन करणारा माणूस आहे. कंगना रणौत डोकं ठिकाणावर नाही त्यामुळे तिच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. यासंदर्भात राज्यातील आरोग्य विभाग योग्य खबरदारी घेईल,” असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.
समाजातून होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे कंगनाने एक पाऊल मागे टाकत “जय मुंबई, जय महाराष्ट्र” असे ट्विट करत नरमाईचा सूर आळवला आहे.
महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी मुंबई आहे आणि मुंबईबद्दल असलेले माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी यशोदा मातेचा दर्जा दिलाय. जय मुंबई, जय महाराष्ट्र…,
असे कंगनाने ट्विट करत आपला सूर बदलला आहे.