*देशातील सर्वात मौल्यवान ब्रँडच्या यादीत एअरटेल अव्वल*
_*ब्रँड मूल्य ४३.२ अब्ज डॉलर; मीशोच्या मूल्यात सर्वाधिक ६४ टक्के वाढ*_
*मुंबई, 20 नोव्हेंबर 2026:* कांतार ब्रँडझेड इंडिया २०२६ च्या भारतातील १०० सर्वात मौल्यवान ब्रँड्सच्या क्रमवारीत एअरटेलने अव्वल स्थान पटकावले आहे. २०१४ मध्ये ही क्रमवारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच दूरसंचार क्षेत्रातील एखाद्या कंपनीने प्रथम स्थान मिळवले आहे.
गेल्या वर्षभरात एअरटेलच्या ब्रँड मूल्यात ५ टक्के वाढ झाली असून ते ४३.२ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे. २०२० पासून कंपनीच्या ब्रँड मूल्यात तब्बल २१० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एअरटेल थँक्स, एअरटेल ब्लॅक, पाचवी पिढी दूरसंचार सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुरक्षित व्यवहार व फसवणूक प्रतिबंधक प्रणाली यांसारख्या सेवा तसेच डिजिटल परिसंस्थेच्या विस्तारामुळे कंपनीच्या ब्रँडची ताकद वाढल्याचे कांतारने म्हटले आहे.
भारतातील १०० सर्वात मौल्यवान ब्रँड्सचे एकत्रित मूल्य ४६०.३ अब्ज अमेरिकी डॉलर असून, हे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे ११ टक्के आहे.
यंदा मीशो सर्वाधिक वेगाने मूल्यवृद्धी करणारा ब्रँड ठरला आहे. मीशोच्या ब्रँड मूल्यात ६४ टक्के वाढ होऊन ते १.९ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे. रॉयल एनफिल्डच्या ब्रँड मूल्यात ६० टक्के, तर टीव्हीएसच्या ब्रँड मूल्यात ३३ टक्के वाढ झाली आहे.
_*पुरस्कार स्वीकारताना भारती एअरटेलच्या मुंबई सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रवींद्र देशपांडे म्हणाले, “हा पुरस्कार आमच्या कर्मचारी आणि ग्राहकांचा सन्मान आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी एअरटेल कटिबद्ध आहे.”*_
फोनपे, भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, क्रेड, पेटीएम, बजाज ऑटो आणि फ्लिपकार्ट यांचाही सर्वाधिक मूल्यवृद्धी नोंदवणाऱ्या प्रमुख ब्रँड्समध्ये समावेश आहे.





























