‘आमने सामने’ नाटकातील मानधनवाढीवरून वाद; दोन्ही बाजूंची भूमिका समोर

‘आमने सामने’ नाटकातील मानधनवाढीवरून वाद; दोन्ही बाजूंची भूमिका समोर

रोहन गुजर, केतकी विलास यांचा नाटकातून काढल्याचा दावा; सहनिर्माते लीना भागवत, मंगेश कदम यांनी मानधनवाढीच्या चर्चेचा घटनाक्रम सांगितला

मराठी रंगभूमीवरील गाजलेले ‘आमने सामने’ हे नाटक कलाकारांच्या मानधनवाढीच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. तरुण कलाकार रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी मानधनवाढीवरून निर्मात्यांशी मतभेद झाल्यानंतर आपल्याला नाटकातून काढण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे केला. त्यानंतर नाटकातील कलाकार आणि सहनिर्माते लीना भागवत व मंगेश कदम यांनी व्हिडिओ पोस्ट करून आपली बाजू मांडली. लीना
भागवत यांनी आपल्या व्हिडिओला ‘नाण्याची दुसरी बाजू’ असे कॅप्शन दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार,रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी मानधनवाढीचा प्रस्ताव तीन वेळा मांडला होता. पहिल्या दोन वेळा त्यांच्या अपेक्षांनुसार मानधनवाढ मान्य करण्यात आली होती.
मंगेश कदम यांनी सांगितले की, दुसऱ्या वेळी त्यांनी स्वतः दोन्ही कलाकारांशी चर्चा करून त्यांच्या मानधनाच्या अपेक्षा मान्य केल्या होत्या. मात्र, नाटक पुन्हा सुरू झाल्यानंतर वर्ष पूर्ण होण्याच्या आतच कॅनडा दौऱ्याच्या वेळी तिसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव आल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी दरवर्षी मानधनवाढ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे लीना भागवत यांनी सांगितले. मात्र, दरवर्षी मानधनवाढ देणे आपल्याला शक्य नसल्याने कलाकारांच्या अपेक्षांनुसार पुढे काम करणे शक्य झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर संबंधित कलाकारांना नाटकात पुढे सहभागी न करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर यापुढे कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट करणार नसल्याचे लीना भागवत यांनी नमूद केले. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंच्या भूमिका सोशल मीडियावर समोर आल्या असून, या वादाची चर्चा रंगभूमीवर सुरू आहे.

IPRoyal Pawns