ज्येष्ठ गायक, अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन
मुंबई, दि. ३१ मे
ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गुवाहाटी येथे शनिवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पं. लिमये सहलीच्या निमित्ताने गुवाहाटीला गेले होते.
लिमये यांचे पार्थिव उद्या १ जून २०२६ रोजी दुपारपर्यंत मुंबईत आणले जाणार आहे. दुपारी अडीचनंतर ४०५, बी विंग, वसंता, दोस्ती विहार, दोस्ती रस्ता, ठाणे (पश्चिम) येथे निवासस्थानी अंत्यदर्शना घेता येणार आहे.
लिमये यांच्या पश्चात पत्नी प्रज्ञा, प्राची, दिपा या विवाहित कन्या, जावई, नातवंडे आणि निनाद हा मुलगा असा परिवार आहे.
नाट्य, शास्त्रीय संगीतातील श्रेष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे हे लिमये यांना गुरु म्हणून लाभले. वसंतराव देशपांडे यांच्याकडे लिमये यांनी तब्बल बारा वर्षे गुरुकुल पद्धतीने गाण्याचे धडे घेतले. वसंतराव देशपांडे यांनी गाजवलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात वसंतराव काम करत असताना लिमये यांना ‘चांद’ ही भूमिका करायची संधी मिळाली तर वसंतरावांच्या पश्चात याच नाटकात वसंतरावांनी लोकप्रिय केलेली ‘खॉंसाहेब आफताब हुसेन’ ही भूमिका करायची संधीही लिमये यांना लाभली. वसंतरावांनी लिमये यांना आपल्या गायकीचे उत्तराधिकारी मानले.
लिमये यांचे वडील गणेश दत्तात्रय लिमये हे कवी होते. नथूबुवा कथ्थक यांच्याकडे ते गाणे शिकले होते तर आई विमल गणेश लिमये या माटेबुवांकडे संवादिनी शिकल्या होत्या. गाण्याचा वारसा आई-वडिलांकडून मिळाला. आईकडून लय आणि वडिलांकडून सूर मिळाला. ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. वसंतराव राजोपाध्ये, ग्वाल्हेर घराण्याचेच गायक पं. नारायणराव व्यास, पं. गजाननबुवा जोशी, सी.पी. उर्फ बाबूकाका रेळे तसेच पुढे आग्रा घराण्याचे गायक बालकराम जाधव, जयपूर घराण्याचे गायक पंडित रत्नाकर पै यांच्याकडे लिमये गाणे शिकले.
गुरु आणि सर्वस्व असलेल्या वसंतरावांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आणि नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्यासाठी, तरुण गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लिमये यांनी २००० मध्ये ‘वसंतराव देशपांडे संगीत सभा’ संस्थेची मध्ये स्थापना केली. करोना येईपर्यंत संस्थेतर्फे विविध कार्यक्रम केले. ‘होरी के रंग’, ‘श्रुतीरंग’ वर्षा के’, शाकुंतल ते कट्यार’, ‘नाट्यरंग’, ‘ हवेली संगीत, घराणोंकी खासियते’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.
पं. लिमये यांना त्यांच्या आजवरच्या दीर्घ सांगितिक कारकिर्दीत ‘सूर संसद’चा ‘सूरमणी’ पुरस्कार मिळाला. कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये तेथील विद्यापीठाकडून त्यांना ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ विषयावर सादरीकरणासाठी बोलाविण्यात आले. कॅनडा, अमेरिकेतील काही ठिकाणी नाट्यसंगीत आणि मराठी अभंग यावर त्यांची व्याख्याने व सादरीकरणही झाले. शास्त्रीय संगीतासाठी केंद्र सरकारची ‘सीनियर फेलोशिप’ त्यांना मिळाली. महाराष्ट्र कलानिकेतनतर्फे ‘महाराष्ट्र वैभव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील सिद्धकला संगीत अकादमीतर्फेही विशेष पुरस्कार देण्यात आला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘स्वर रंगराज’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली आणि नागपूर दूरदर्शन केंद्रांवर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत. मुंबई महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली या ठिकाणी लिमये यांच्या सांगितिक मैफली झाल्या आहेत. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, देवास येथील कुमार गंधर्व सोहळा, कर्नाटकातील कुंदगोळ येथील सवाई गंधर्व संगीत महोत्सव, नागपूर, दिल्ली येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह, नवी दिल्लीत पं. पलूस्कर पुण्यतिथीनिमित्त संगीत संमेलन, दिल्लीतील संगीत नाटक अकादमी, दिल्लीतीलच भेंडी बाजार घराणा संगीत संमेलन अशा विविध ठिकाणी लिमये यांचे गायन झाले होते.
लिमये यांनी गायलेल्या मराठी अभंगांची ‘भक्तीयात्रा’ ही ध्वनिफीतही प्रकाशित झाली आहे. ज्येष्ठ संगीतकार दिवंगत स्नेहल भाटकर यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. ‘जयध्वनी’ या जोडरागाची आणि ‘चंद्र मोहिनी’ या स्वतंत्र रागाची निर्मितीही लिमये यांनी केली होती. तसेच ‘देखादेखी’सह अनेक बंदिशी आणि तराणे त्यांनी बाधले आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा ‘ या मराठी चित्रपटात लिमये यांनी अंध गवई’ भूमिका साकारली होती. ‘द फर्म लॅण्ड’ या फ्रेंच चित्रपटात लिमये यांची गाण्याची मैफल दाखविली आहे.





























