*झाडानं धरलंय भूत*
अवधूत गुप्तेंच्या आवाजातील ‘तुंबाडची मंजुळा’मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटांमध्ये ज्याची सर्वात जास्त चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे *तुंबाडची मंजुळा*. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने, टीझरने आणि गाण्याने यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. आता यातील ‘ झाडानं धरलंय भूत’ हे नवं कोरं आणि धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. मराठीतील रॉकस्टार आणि रसिकांचे लाडके, लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांनी भीती, रहस्य आणि त्यातून उडणारा गोंधळ असे सगळेच भाव या गाण्यात उतरवले आहेत. एखाद्या व्यक्तीला किंवा गावाला भूतबाधा झाली आहे असा समज झाल्यानंतर गावातील सगळेजण एकत्र येऊन मंत्र – तंत्र, अंगारे धुपारे याचा आधार घेऊन काय काय उपाय योजना करतात आणि त्यातून उडणाऱ्या गोंधळातून काय धमाल होते हेच या गाण्यातून दाखवण्यात आलं आहे.
गावात सारी ही चर्चा रे , गप्पांना आलाय उत ! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलंय भूत ? असे गंमतीदार शब्द असलेल्या या गाण्याची चालही तेवढीच मजेदार झाली आहे.
या गाण्याबद्दल *अवधूत गुप्ते* म्हणाले, “हे गाणं गाताना खूपच मजा आली कारण या गाण्याचा थोडा सस्पेन्स आणि विनोदी बाज आहे. तसेच हे गाणं प्रेक्षकांना थेट गावात घेऊन जातं आणि तिकडची खबरबात काढण्यासाठी उत्सुकता निर्माण करतं. अर्थात हे गाणं चित्रपटात काय धमाल करतं हे समजण्यासाठी आणि चित्रपटाची इंत्यभूत खबरबात काढण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटच पाहावा लागेल.”
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसायप्रमुख *बवेश जानवलेकर* म्हणतात की, “तुंबाडची मंजुळा हा चित्रपट सर्वांसाठीच परीपूर्ण असा मनोरंजक चित्रपट असणार आहे. यातील गाणी ही याची जमेची बाजू असून प्रत्येक गाणं हे वेगळ्या शैलीचं आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘असं वेगळं गाव’ मधून राहूल देशपांडे आणि आर्या आंबेकरच्या आवाजामधून या गावाची ओळख झाली होती. आता प्रदर्शित झालेल्या ‘झाडाला धरलंय भूत’ गाण्यामधून गावकऱ्यांच्या विविध तऱ्हा प्रेक्षकांना कळणार आहेत. अवधूत गुप्ते यांच्या आवाजामुळे या गाण्याची रंगत अजूनच वाढली आहे.”
असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर, तेजस जोशी या नव्या दमाच्या संगीतकार त्रयींनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून या धमाल गाण्याचे शब्द विक्रम एडके यांनी लिहिले आहेत. ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केले असून यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार पाहायला मिळतील. झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी ‘तुंबाडची मंजुळा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.




























