आजच्या प्रेक्षकांच्या मनातील लावणी करतोय – हरी पाटणकर

आजच्या प्रेक्षकांच्या मनातील लावणी करतोय – हरी पाटणकर

पारंपरिक लावणीची आधुनिकतेशी सांगड घालत महाराष्ट्राची लोकगीते आणि लावणी एकत्र येतात तेव्हा ताल,सूर आणि भावना यांचा मेळ अप्रतिम साकारतो. मातीचा सुगंध घेऊन आलेले सूर आणि नृत्यातून विश्लेषण करणाऱ्या कथा यांचा संगम म्हणजेच संस्कृतीचा आणि उत्साहाचा खरा उत्सव.

“माझा लावण्या दरबारचा ‘पाव्हणं जरा जपून हा कार्यक्रम सुरू असून, त्याचे जवळपास २२ प्रयोग झाले आहेत. त्याला दूरदूरून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे ऑडिशनसाठी व कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांचा सहभाग अधिक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मला वाटलं की, लावणीवर अजून एक वेगळा कार्यक्रम तयार करावा. माझा नेहमीच प्रयत्न असतो की, लावणीला अश्लीलतेपासून दूर ठेवून नऊवारी साडी, पारंपरिक शृंगार आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून सादर करावं, जेणेकरून ही आपली परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. फोक डान्स व फोक कल्चरमधून
प्रेरणा घेऊन मी विचार केला की आपणही बरंच काही सादर करू शकतो आणि अशा प्रकारे ‘फोक लावणी रॉक्स’ या कार्यक्रमाची संकल्पना माझ्या मनात आली., ” ‘फोक लावणी रॉक्स’ ची संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली ते हरी पाटणकर mumbainews 24×7 ला सांगत होते.

माझ्या मते आजच्या पिढीला लावणी ही एक परंपरागत नृत्यकला म्हणून समजलीच पाहिजे आणि त्याच वेळी रॉक म्युझिकच्या माध्यमातून वेस्टर्न संस्कृतीचाही अनुभव या कार्यक्रमात घेता येणार आहे. जेव्हा परंपरा
आणि आधुनिकता एकत्र येतात, तेव्हा त्यातून एक आगळंवेगळं फ्युजन तयार होतं आणि याच विचारातून या प्रोजेक्टला ‘फोक लावणी रॉक्स’ हे नाव देण्यात आलं. या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे तसेच संगीत दिग्दर्शक आमिर हाडकर आहेत.

कलाकारांची निवड ऑडिशनच्या माध्यमातून केली असून या वरून ठरतं की, कोणता कलाकार कोणता कार्यक्रम सादर करणार. यापूर्वी ‘काळू-बाळू’ अशी संकल्पना होती, पण आता नव्याने ‘फोक-रॉक’ या संकल्पनेवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आजचे प्रेक्षक नव्या विचारांचे असून, ते नेहमी वेगळ्या व
नावीन्यपूर्ण संकल्पना पाहण्यास उत्सुक असतात. त्यामुळे या वेळेला आम्ही परंपरा आणि आधुनिकतेचं एकीकरण साधून कलाकारांची निवड केली.

कडू व गोड आठवणी तर प्रत्येकाच्या प्रवासात निर्माण होतच असतात. आमच्याही कामाच्या अनुभवात असे प्रसंग येतात, जेव्हा प्रेक्षकांना कार्यक्रमात काही बदल हवे असतात आणि आम्ही ते बदल त्वरित करून दाखवतो. खरं पाहिलं तर प्रेक्षकांवर अवलंबून असतं की सादरीकरण कसं करावं. आजवर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आमचा शो झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगानुसार सादरीकरणात कसा बदल करायचा याची आम्हाला चांगली जाणीव आहे. त्यानुसार आमचे पुरुष आणि महिला कलाकारही पूर्ण उत्साहाने त्या त्या पद्धतीत
सादरीकरण करतात.
या कार्यक्रमाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. जिथे जिथे नाट्यगृह आहेत, तिथे तिथे आमचा ‘फोक लावणी रॉक्स’ सादर करण्याचा मानस आहे. शिवाजी मंदिरसह अनेक नाट्यगृहात प्रयोग आयोजित होणार आहेत, तसेच गणपतीच्या काळात जालना येथे एक प्रयोग होणार आहे. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की शक्य तितक्या आणि जास्तीत जास्त ठिकाणी हा
कार्यक्रम पोहोचावा.

IPRoyal Pawns