मराठी नाट्य निर्मात्यांच्या रास्त मागण्यापूर्तीसाठी प्रयत्नशील! – lआशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री
मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मराठी नाट्यसृष्टी पुढील समस्या दूर करणे, व्यवहार्य मागण्यांची पूर्तता करणे; हे शासन म्हणून आमचे कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून आपल्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करीत आहोत, अशी खात्री राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा”च्या पदाधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीत नाट्य निर्माता संघ पदाधिकाऱ्यांनी सर्व नाट्य निर्मात्यांच्या नाटकाचे नेपथ्य (सेट) व अन्य सामान एकाच जागी ठेवण्यास गोडाऊनसाठी जागा मिळावी ; नाटकाच्या सामानाची व रंगकर्मीची वाहतूक करणाऱ्या बस व या टेम्पोच्या पार्किंगसाठी गोडाऊन जवळच जागा मिळावी ; नवीन नाटक निर्मितीसाठी मिळणाऱ्या अनुदानात भरघोस वाढ व नियमावलीत बदल व्हावा ; नाट्य निर्मात्यांना निवासासाठी सवलतीच्या दरात सिडकोच्या सदनिका उपलब्ध करून द्याव्यात; ह्या प्रमुख मागण्या नाट्य निर्माता संघातर्फे बैठकीत सादर करण्यात आल्या.
“मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा”चे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे म्हणाले, मंत्री महोदयांनी आमच्या समस्या तपशिलासह समजून घेतल्या. त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे सांगितले. ह्या गोष्टी नाट्य निर्मात्यांना आणखी चांगल्या नाट्यकृती रंगमंचावर आणण्यासाठी बळ देणाऱ्या आहेत.”































