“महाराष्ट्र शाहीर ही बाबांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिलेली भेट” – केदार शिंदे
“मला महाराष्ट्र शाहीर का करावासा वाटला याची काही कारण आहेत मला बाबा कळायला लागले ते माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजेच ८३ ला बाबांनी जेव्हा ‘लोकधारा’ नावाचा कार्यक्रम केला आणि हा लोकधारा नावाचा शो त्याकाळी प्रचंड गाजला तेव्हा पासून, २०१५ ला शाहीर साबळे यांचे निधन झाल्यानंतर मला हळूहळू असे वाटायला लागले की त्यांचे नांव हळूहळू पुसले जात आहे २०२३ हे बाबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे व माझ्या डोक्यात कल्पना आली की जन्मशताब्दी वर्ष हे वेगवेगळ्या लोकांचे साजरा करतात मग आपणही बाबांचं जन्मशताब्दी वर्ष एका वेगळ्या प्रकारे बाबांना मानवंदना देऊन का साजरे करू नये आणि म्हणूनच ‘महाराष्ट्रा शाहीर’ ही संकल्पना पुढे आहे.”
आणि आज चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’ तुमच्यासमोर आणण्यास आम्हाला आनंद होत आहे.
बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे नुकतेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
“शासन दरबारी मी या चित्रपटासाठी जे जे म्हणून करण्याची गरज असेल ते सर्व करेन, याची ग्वाही देतो,” असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळेस सांगितले
अंकुश चौधरी यावेळी बोलताना म्हणाला की, तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एक सर्वांगसुंदर असा चित्रपट तयार झाला आहे. “हा चित्रपट आपण आणि नव्या पिढीने आवर्जून पाहावा आणि आपण त्यांना तो दाखवावा, असा आहे. त्यातून पुढील पिढीला लोककला, लोकसंस्कृती कळेल, त्यावेळचे विचार, राष्ट्राभिमान, महाराष्ट्राभीमान, मराठीचा अभिमान काय असतो याची जाणीव होईल. शाहिरांची तगमग, प्रगल्भता, विचार या चित्रपटातून प्रगट होतात. यात शाहिरांचे एक नवीन गाणे घेण्यात आले आहे. ते अत्तापर्यंत गुलदस्त्यात होते. ते लोकांना भावते आहे. मला पूर्ण खात्री आहे की २८ एप्रिल रोजी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षक बरेच काही भरभरून घरी घेवून जाणार आहेत.”