गायिका श्रुती रायचं ‘मन का शोधते…’ गाणं प्रदर्शित…
संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध म्युझिक कंपन्या नवनवीन गाणी रसिकांच्या भेटीला आणत आहेत. या स्पर्धेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेली पिकल म्युझिक संगीतप्रेमींसाठी ‘मन का शोधते’ हे एक नवं कोरं रोमँटिक गाणं घेऊन आली आहे. आजच्या सिंगल्सच्या जमान्यात अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर गायन, मनमोहक संगीत आणि लक्षवेधी सादरीकरण यांचा अनोखा संगम घडवणारं ‘मन का शोधते…’ हे गाणं रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारं असल्यानं रिलीज झाल्याबरोबर लगेच या गाण्यावर सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजचा वर्षाव होऊ लागला आहे.
समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेलं ‘मन का शोधते…’ हे गाणं नुकतंच अंधेरीतील कंट्री क्लबमध्ये लाँच करण्यात आलं. या सोहळ्याला वसंत राय, गायिका श्रुती राय, सदानंद शेट्टी, पिकल म्युझिकचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी, दिग्दर्शक कैलाश पवार, कलाकार सीमा कुलकर्णी आणि प्रशांत कराड यांच्यासह ‘मन का शोधते…’ची संपूर्ण टिम उपस्थित होती. हरहुन्नरी गायिका श्रुती राय आणि अभिषेक नलावडे यांच्या सुमधूर आवाजात हे गाणं ऐकताना कान तृप्त होतात. ‘मन का शोधते…’ हे गाणं प्रेमाची अनोखी अनुभूती देणारं आहे. गीतकार अंबरीश देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं संगीतकार अमेय मुळे यांनी संगीतबद्ध केलं आहे. दिग्दर्शक कैलाश पवार यांनी या गण्याचं नेत्रदीपक दिग्दर्शन केलं आहे. सीमा कुलकर्णी आणि प्रशांत कराड या कलाकारांच्या जोडीला श्रुती रायनंही या गाण्यात परफॅार्म केलं आहे. ‘मन का शोधते…’ या गाण्याबाबत श्रुती म्हणाली की, मनाची अवस्था दर्शवणाऱ्या या गाण्यातील शब्द अतिशय मार्मिक असून, त्यांना संगीतकार अमेय मुळे यांच्याद्वारे साजेसं संगीत दिलं जाणं हे या गाण्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे गाणं गाताना एक वेगळ्या धाटणीचं गाणं गायला मिळाल्याचा आनंद तर होताच, पण रसिकांसमोर काहीतरी अनोखं घेऊन जाण्याची संधी मिळाल्याचं समाधानही होतं. दिग्दर्शक कैलाश पवार यांनी अत्यंत देखणा व्हिडिओ बनवून ‘मन का शोधते…’ हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. पिकल एंटरटेनमेंट नेहमीच नवोदित कलाकारांना आणि नवीन गायकांना व्यासपीठ देत आली असून यापुढेही हे काम अविरतपणे सुरू राहणार असल्याचे समीर दीक्षित म्हणाले.
मॅक्सवेल फर्नांडीस यांनी या गाण्याच्या व्हिडिओची निर्मिती केली आहे. नृत्य दिग्दर्शक प्रमोद कुमार बारी यांनी कोरिओग्राफी केली आहे. प्रितम अंडागळे यांनी द्रोण हाताळला असून, संकलनाचं काम दिग्दर्शक कैलाश पवार यांनीच केलं आहे.