शाहीर साबळेंची आई लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत ‘संगीत देवबाभळी’मधील ‘आवली” शुभांगी सदावर्ते

शाहीर साबळेंची आई लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत ‘संगीत देवबाभळी’मधील ‘आवली” शुभांगी सदावर्ते

‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात ‘आवली” शुभांगी सदावर्ते ही सध्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून ‘आवली”च्या भूमिकेत गाजत असलेली गुणी अभिनेत्री शाहीर साबळे यांची आई लक्ष्मीबाई गणपतराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतील शुभांगीचे पोस्टर प्रकाशित करून तिच्या या सिनेमातून होत असलेल्या पदार्पणाची बातमी निर्माता-दिग्दर्शकांनी रसिकांसमोर आणली आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे! 28 एप्रिल २०२३मध्ये चित्रपट प्रदर्शित होत असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रीकरणाला सुरुवात झाली. सध्या वाई, भोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे. शुभांगी या चित्रीकरणात सहभागी झाली आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’शी अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. काही दुर्मिळ योगायोगसुद्धा या चित्रपट निर्मितीने साध्य केले आहेत. नातवाने आजोबांवरील म्हणजे केदार शिंदेने त्याचे आजोबा शाहीर साबळे यांच्यावरील चित्रपट दिग्दर्शित करण्याचा चित्रपटसृष्टीतील एक दुर्मिळ योग यात जुळून आला. त्यानंतर या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका कोण करत आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. ही भूमिका शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे साकार करत आहे! हा आणखी एक दुर्मिळ योगायोग याआधीच पुढे आला आहे.

त्यानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल आणखी एक नवीन आणि अभिमानास्पद गोष्ट घडली ती म्हणजे या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क समाज माध्यमांवर ‘चंद्रा’ गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले. जयेश खरे हा शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणारा गरीब घरातील मुलगा. त्याच्या खडया आवाजातील ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे त्याने शाळेच्या गणवेशात गायलेले गाणे सध्या युटयूबवरून उभ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. हे गाणे ‘महाराष्ट्र शाहीर’चे संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याचा शोध घेतला गेला. त्याला मुंबईला आणून एका उत्तम हॉटेलमध्ये ठेवले गेले.त्याच्याबरोबर अजय-अतुल यांनी दोन दिवस तालीम केली आणि त्याच्या आवाजातील गाणे गाऊन घेतले.

या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.

शुभांगी सदावर्तेच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचे जसे योगदान होते तसेच त्यांची आई लक्ष्मीबाई यांचाही मोलाचा वाटा होता. त्यांच्या उत्तम संस्कारात शाहीर वाढले आणि त्यांना कलेची आवड निर्माण झाली. शुभांगी सदावर्ते ही गुणी अभिनेत्री या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या सहज वावरातून ही व्यक्तिरेखा विशेष उठून दिसणार आहे.”

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns