मिलिंद बेर्डे /लांजा।
गॅस वाहतूक करणारा टॅंकर पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदीत कोसळला.
मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे झालेल्या अपघातात टँकर चालकाचा टँकर खाली अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २.४८ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे
गोव्याच्या दिशेने जाणारा MH 12 LT 6488 हा गॅस वाहतूक करणारा टॅंकर गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी गोव्याच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये चालक हा कंटेनर खाली अडकून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे महामार्ग वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक घोसाळे, पोलीस हवालदार पावसकर, पोलीस हवालदार पवार , भरणकर, संसारे याबरोबरच हॅन इन्फ्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी आणि श्यामकुमार गिरी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी ४.३० वाजता टॅंकर बाजुला करुन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
नदीत पडल्याने या गॅस टँकरला पाठीमागून गळती सुरू झाली होती. त्यामुळे या ठिकाणी संबंधित सुरक्षा अधिकारी दाखल झाले होते. तर सुरक्षिततेबाबत मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती.