शिवतिर्थवर दसरा मेळावा कोण घेणार यावर अखेर निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने आज फेटाळून लावली.
शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता, तर त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगीकरता अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही अर्ज महापालिकेकडे परवनगीच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान, शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जी उत्तर विभागाकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये जी उत्तर विभागाने या परवानगीबाबत विधी विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आल्याचे लेखी उत्तर शिवसेनेला दिले होते.