रत्नागिरी जिल्ह्यात ३५०० फूट उंचीवर फडकला तिरंगा
लांजा / मिलिंद बेर्डे
संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी लांजा तहसीलदारांनी जिल्ह्यातील सर्वात उंच ३५०० फूट उंच असलेल्या माचाळ या पर्यटन स्थळावर तिरंगा फडकविला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढाच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशभक्तीची भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण ठिकाणी जनजागृती व्हावी म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये उंच असलेल्या आणि पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या माचाळ या गावी जाऊन ३५०० फुटावर तिरंगा झेंडा फडकविला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. अशाच पद्धतीने हे अभियान लांजा तालुक्यात देखील गावागावांमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमावेळी दुर्गम भागातील काही वाड्यांमध्ये तहसीलदार प्रमोद कदम यांनी स्वतः जाऊन हे अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. तसेच या अभियानासोबत लांजा पुरवठा विभागाच्या वतीने रेशन कार्ड वाटपाचा ही कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या त्यांच्यासोबत लांजा पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, विजय बनकर, पुरवठा अधिकारी राहुल शितोळे, कुलदीप गायकवाड ,तलाठी संतोष हांडे, न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर आदी यावेळी उपस्थित होते.