खोरनिनको धबधबा प्रवाहित
लांजा: / मिलिंद बेर्डे,
क्षत्रपति शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खोरनिनको गावामधे पावसाळी पर्यटनाचे ठिकाण म्हणून ओळख असलेला मानवनिर्मित खोरनिनको धबधबा प्रवाहित
निसर्गाचे विलोभनीय दृश्य, हळूहळू पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
पर्यटकांची मागणी
पर्यटनाच्यादृष्टीने सेवा सुविधांचा अभाव, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज.
पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने हक्काचे ठिकाण असलेल्या लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण आणि मानवनिर्मित धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य यांची देही याची डोळा पाहण्यासाठी सध्या या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
लांजा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत खोरनिनको गावातील खोरनिनको धरण आणि येथील मानवनिर्मित धबधबा हा गेल्या काही वर्षात पर्यटकांसाठी व पर्यटनाचे हक्काचे ठिकाण बनले आहे .भुशी डॅम अशी ओळख बनलेल्या खोरनिनको धरणाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
गेल्या चार ते पाच वर्षांत या खोरनिनको धरण आणि धबधबा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
मात्र पर्यटनाच्या दृष्टीने आजही या ठिकाणी म्हणाव्या तशा सेवा सुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो. नाही म्हणायला या ठिकाणी वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था येथील राजाराम सावंत यांनी उपलब्ध करून दिली आहे. मात्र अन्य सेवा सुविधांची मात्र वानवाच आहे.
त्यामुळे शासनाने आणि लोक प्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करुन उपाय योजना केल्या तर या ठिकाणचे सौंदर्य अधिक वाढेल आणि जास्तीत जास्त पर्यटक येतील. त्यामुळे हे ठिकाण आणखी प्रसीध्द होईल असे मत पर्यटकांनी व्यक्त केले.