“तिरसाट” प्रेमाचं ‘फर्मान आलंया’
‘उधाण आलंया, फर्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे शब्द असलेलं “तिरसाट” चित्रपटातलं श्रवणीय गाणं नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अल्पावधीतच सोशल मीडियावर या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून २० मे रोजी “तिरसाट” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं “तिरसाट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.निलेश कटके लिखित “फर्मान आलंया” हे गीत पी. शंकरम यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे, नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
अतिशय सुंदर शब्द, तितकंच श्रवणीय संगीत आणि अप्रतिम असं छायांकन या गाण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार “तिरसाट” या चित्रपटातून मांडण्यात आला असून नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.