स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘पॉंडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या ट्रेलरमध्ये दिसले. ‘पॉंडीचेरी’बाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढत असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सचिन कुंडलकर ‘पॉंडीचेरी’ची सैर घडवणार आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ‘पॉंडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.
सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.” तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ”माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल.” ‘पाँडीचेरी’तील आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” मी एक अशी व्यक्तिरेखा साकारतेय, जिचे आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी हो म्हणायचे मुख्य कारण म्हणजे ही कथा मला खूप भावली आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी खूपच रंजक पद्धतीने ती मांडली. मुळात हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे हा अनुभवही खूप आगळावेगळा होता. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मर्यादित क्रू सोबत काम करणे खूपच आव्हानात्मक होते. मात्र हे आव्हान पेलून आम्ही सगळ्यांनीच चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. हा माझ्यासाठी नवीन आणि खूप छान अनुभव होता.”