आज १६ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कारभारावर होत असलेल्या कथित आरोप प्रत्यारोपा संबंधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काही नियामक मंडळ सदस्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून वाटल्यास तुम्ही तुमच्या बाजूने असणाऱ्या सदस्यांची एक सत्यशोधन कमिटी बनवून चौकशी करावी व या चौकशीत दोषी आढळल्यास मी स्वतःहून राजीनामा देईन असे उलट आव्हान आरोप करणाऱ्यांना दिले.
त्याच प्रमाणे अध्यक्षांनी यावेळेस आपण कोणताही गैरव्यवहार केला नसून आपल्या अगोदर असलेल्या अध्यक्षांच्या कार्यकाळात झालेला गैरव्यवहार पुराव्यानिशी उघड करू असा सिक्सरच मारला त्यामुळे आता हे प्रकरण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
*२००५ पासून यशवंत नाट्यगृहाला अग्निशमन दलाची NOC नाही*
प्रसाद कांबळी पुढे म्हणाले २००५ पासून या नाट्यगृहाला अग्निशमन दलाची NOC नाही आहे आमच्या कार्यकाळात जेव्हा मला हे समजले तेव्हा मी तातडीने ते विश्वस्थांच्या मीटिंग मध्ये मांडले व सर्वानुमते असे ठरले की जो पर्यंत अग्निशमन दलाची NOC मिळत नाही तो पर्यंत नाट्यगृह चालू करावयाचे नाही.
आत्ता पर्यंत घरातील वादविवाद चव्हाट्यावर न आणता ते घरच्याघरी सोडवूया या नात्याने आम्ही गप्प होतो मात्र काही लोकांना ते चव्हाट्यावरच आणायचे असतील तर आम्ही सुद्धा आता गप्प बसणार नसून त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत कारण त्यांचा बोलावता धनी कोण आहे हे एव्हाना सर्वांना ठाऊक झाले आहे. काही दिवस बॅकफूटवर खेळणारे प्रसाद कांबळी एकदम फ्रंटफूट वर येऊन खेळावयास लागल्याचे दिसत असल्याने अध्यक्षां विरुद्ध मोहीम राबवणारे आता कोणत्या प्रकारची बॉलिंग टाकतात यावर सर्व नाट्यकर्मींचे लक्ष लागून राहिले आहे.