बसत्याच्या मुलीच्या बापाला खस्ता
सचिन चिटणीस ( *** )
लाखोंचा पोशिंदा उपाशी म्हणतात ते काही खोटे नाही हा प्रत्यय तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बस्ता’ हा चित्रपट पाहतांना होतो व हसवता हसवता नकळत आपले डोळे पाणावतात.
नामदेव ( सुहास पळशीळकर )आपली बायको ( शुभांगी गोखले ) व दोन मुली सह राहत असतो. मोठ्या मुलीचे लग्न गावातीलच नोकरी करणाऱ्या इसमा सोबत लावून दिलेले असते व धाकटी मुलगी स्वाती ( सायली संजीव ) ची लग्नाची बोलणी सुरू असतात, स्वातीला शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको असतो तिला सरकारी नोकरी करणारा मुलगाच हवा असतो.
त्यासाठी दुसऱ्या गावातील मुलाचे ( सुरज पवार ) स्थळ पाहण्यात येते, लग्न जुळते मग लग्नाची बोलणी सुरू होतात मुला कडील मंडळीं कडून हुंडा रुपी मागणी वाढतच जाते. खर्च नामदेवच्या हाताबाहेर जावयास लागतो तरीही नामदेव आपल्या मुलीसाठी शेतजमीन गहाण टाकून पैसे उभे करतो.
बस्ताला मुलाकडची मंडळी महागात महाग कपडे, साड्या खरेदी करतात त्यात मुलाची बहीण ( प्राजक्ता हनमघर ) आघाडीवर असते.
स्वातीचा मावस भाऊ मन्या ( अक्षय टांकसाळे ) चे स्वातीवर प्रेम असते मात्र तो शेतकरी असल्याने स्वाती त्याच्या बरोबर लग्न करण्यास तयार नसते.
इथे बसत्याला पैसे कमी पडतात म्हणून बस्ता दुकानातच ठेवून नंतर पैसे देऊन घ्यायचे ठरते त्यासाठी मामीचे सोने उपयोगी पडते.
नामदेव बस्ता आणण्यासाठी टेम्पो घेऊन जातो मात्र त्याच्या पुढे काय रामायण घडणार असते हे पाहणे चित्रपटगृहात जाऊन बघणेच उचित होईल.
यात भारत गणेशपुरे, सागर कारंडे, सुबोध भावे यांच्या धमाल भूमिका आहेत त्यातच दिग्दर्शकाने राजकीय पुढारी, त्यांचे चेले व पत्रकार यांच्यावर देखील मार्मिक टिपण्णी केली आहे, एकूणच हा चित्रपट प्रबोधना बरोबर आपले मनोरंजनही करतो.
कलाकार – सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुहास पळशीकर, शुभांगी गोखले, ज्योती सुभाष, सुबोध भावे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाट, रोहित चव्हाण, नंदकिशोर चौगुले, माधवी जुवेकर, प्राजक्ता हनमघर, पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी, कल्पना जगताप, सुरज पवार, अरबाज शेख, धनंजय जोशी, किशोर, राज वळवेकर