ज्याची नाट्यरसिक आतुरतेने वाट बघत असतात असे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन या वेळेस १०० वे असून त्याची उत्कंठा रसिकांमध्ये शिगेला पोचली असतानाच या नाट्यसंमेलनाची तारीख व स्थळ बुधवारी अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जाहीर केली, त्याप्रमाणे २७ मार्चला १०० व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन सांगली येथे होणार असून त्याचा समारोप १४ जूनला मुंबईत होणार आहे व या तब्बल ५१ दिवसांच्या संमेलनात महाराष्ट्रभर विविधरंगी कार्यक्रम साजरे होणार आहेत.
२५ मार्च २०२० रोजी गुडीपाडव्याला राजस्थान येथील तंजावर मधून १०० व्या नाट्यसंमेलनाची सुरवात व्यंकोजीराजे यांना अभिवादन करून करण्यात येईल.
२६ मार्च ते २९ मार्च सांगली येथे १०० वे नाट्यसंमेलन रंगणार. २६ मार्चला नाट्यदिंडी व संगीत सीता स्वयंवर हे विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सांगली येथे प्रथम सादर केलेल्या संगीत नाटकाचे आयोजन. तर २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिनी १०० व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन तर २८, २९ मार्चला विविधरंगी कार्यक्रम होणार आहेत.
३० मार्च ते ७ जून या मधल्या काळात महाराष्ट्रभर संमेलन होणार असून त्यात नाट्यजागर होणार असून स्थानिकांच्या सहभागावर भर देण्यात येणार आहे.
८ जून ते १४ जून मध्ये मुंबई येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तसेच एकपात्री, बालनाट्य, एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक नाटक, संगीत नाटक, व्यावसायिक नाटक, लोककला, लोक संगीत, अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षा निमित्त कार्यक्रम, १०० नाट्यसंमेलन झाली त्याचा इतिहास, विविध नाट्य विषयक चर्चासत्र, परीसंवाद हे कार्यक्रम साजरे केले जाणार असल्याचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले.
१४ जून ला गो. ब. देवल पुरस्काराचे वितरण व १०० व्या नाट्यसंमेलनाचा समारोप मुंबईत होणार असून अद्याप मुंबईतील ठिकाण निश्चित झाले नसल्याचे कांबळी यांनी सांगितले.