एका नटसम्राटाची एक्झिट, नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागु यांचे निधन.
अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी होणार असून, या अगोदर त्यांचे पार्थिव बालगंधर्व मंदिराच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया –
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस-
गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे.
डॉ. लागू हे अभिनय जगतातील ‘सिंहासन’ होते. या ‘कलेच्या चंद्रा’ने ‘सामना’, ‘पिंजरा’ असे अनेक चित्रपट गाजवले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार-
नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागु यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली असल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ श्रीराम लागु यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा डॉ लागुंनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोचवली. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक कलावंतासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले .. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीची तसेच हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी शोकसन्देशात म्हटले आहे.
सुबोध भावे-
सर्वार्थाने मोठा अभिनेता, रंगकर्मी आणि आमचे आदर्श श्रीराम लागू गेले याचं अतीव दुःख झालं नाटकांवर प्रेम करणारा माणूस हरपला याचं दुःख होत असल्याचं अभिनेता सुबोध भावे.
सुमीत राघवन-
डॉ. श्रीराम लागू हे हॅम्लेट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी तीन तास ते नाटक पाहिलं त्यानंतर मला आशीर्वाद दिले त्यामुळे मी भरुन पावलो – अभिनेता सुमीत राघवन.
राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली – राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई –
मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. या दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो – राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई.