” ‘इतिहासातील असंही एक पान : गांधी हत्या आणि मी’ या नाटकात एकूण १४ पुस्तकांचा संदर्भ घेतला असून सेन्सॉर बोर्डाने नाटकातील एक शब्दही कट केलेला नाही. आम्ही नाटक प्रेक्षकांना सुपूर्द केले असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की ते महात्मा गांधीच्या विचाराचे आहेत की नथुराम गोडसे यांच्या, माझे स्वतःचे मत विचाराल तर माझा महात्मा गांधींच्या विचारांना पाठिंबा नाही.” ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेची ८९ वी कलाकृती ‘इतिहासातील असंही एक पान : गांधी हत्या आणि मी’ या नाटकाचे दिग्दर्शक व अभिनेते महेश डोकफोडे सांगत होते.
” सौरव ने जेव्हा मला सांगितले की मी असे असे एक नाटक करतोय तर सुयोग ते करेल का? त्या वेळेस खरे सांगायचे म्हणजे २ सेकंदा करता मी सुद्धा स्तब्ध झालो मात्र बरेच वर्षा पासून इतिहासावर सुयोग ला नाटक करायचे होते आणि मला वाटते ते हेच होय” संदेश सुधीर भट सांगत होते.
गोपाळ मराठे प्रॉडक्शन्स यांचे हे नाटक संदेश सुधीर भट सादर करत आहे. गोपाळ मराठे व कांचन सुधीर भट हे या नाटकाचे निर्माते आहेत.
या नाटकात नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता सौरभ गोखले साकारत आहे. सौरभ गोखले याच्यासह रुपाली भोसले, अंबरीश देशपांडे, अक्षय मुडावदकर, महेश डोकफोडे आदी कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महेश डोकफोडे यांनी केले आहे. नाटकाचे संगीत शैलेंद्र बर्वे यांचे आहे. या नाटकाची प्रकाशयोजना भूषण देसाई यांनी केली असून, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. वेशभूषेची जबाबदारी सुनील वंजारी यांनी; तर रंगभूषेची जबाबदारी संदीप नगरकर यांनी सांभाळली आहे. २० डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.