या चित्रपटाला मिळत आहेत 2.5 स्टार – दीनानाथ घारपुरे
माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कोणत्या वयात कोणते संकट कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही. आपला विचार सकारात्मक जरी असला तरी आपल्या आजूबाजूला दुष्ट प्रवृत्ती फिरत असतात. त्यांनी आपल्याला हेरून ठेवलेले असते. आणि मग एका काळोख्या रात्री…..अंधारात काही घडू शकते. आणि मग ज्याच्यावर हे संकट येते त्यांची मन:स्थिती बिघडून जाते. एका तरुण मुलीवर एक आघात होतो. आणि तिचे मन हे बिथरून जाते. अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर ‘मन उधाण वारा’ ची कथा- कल्पना रचलेली आहे. एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारा हा सिनेमा आहे.
द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडकशन आणि लोका एंटरटेनमेंट , पेन मुव्हीजचे जयंतीलाल गडा , यांनी ह्या सिनेमाची प्रस्तुती / निर्मिती केली आहे. दिग्दर्शन संजय मेमाणे यांनी केल असून कथानक प्रदीप कुरबा यांचे आहे. निर्माते निशांत कौशिक, अक्षय गडा , धवल गडा हे असून पटकथा-संवाद- सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांनी लिहिले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी मिलिंद जोग यांनी सांभाळलेली आहे. यामध्ये मोनल गज्जर, ऋत्विज वैद्य, किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ. शरद भूताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, असे कलाकार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन संजय मेमाणे यांनी सुव्यवस्थितपणे केले आहे. कोकणचे सौंदर्य मिलिंद जोशी यांनी छान टिपले आहे. काही ठिकाणी चित्रपट संथ होत जातो. सुरवातीला पकड घेणारा चित्रपट अधेमधे आपली पकड सैल करतो. अमितराज, हर्षकरण, आदित्य, सतीश चक्रवर्ती यांचे संगीत सुमधुर आहे. आगळीवेगळी प्रेमकथा असून मनातील भावनांचे विविध कंगोरे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. कितीही संकटे आली तरी माणसाने सकारात्मक रहायला हवे हा संदेश चित्रपट देऊन जातो. शेवटी प्रेक्षकच ह्या चित्रपटाचे भवितव्य ठरवतील.