‘हिमालयाची सावली’त  विघ्नेश जोशी ‘तातोबा काशीकर’

अशोक सराफ यांच्यासारख्या मात्तबर कलाकाराने साकारलेली भूमिका करणं हे कोणत्याही कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट असली तरी ती तितकीच जबाबदारीची असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. १९७२ साली आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील अशोक सराफ यांच्या अभिनयाने सजलेली तातोबा काशीकर ही व्यक्तिरेखा साकारण्याचे भाग्य अभिनेता विघ्नेश जोशी यांना लाभले आहे.

‘हिमालयाची सावली’ या नाटकात ही भूमिका नव्या संचात साकारणारे विघ्नेश जोशी सांगतात की, ‘मोठ्या कार्यासाठी अपमान सहन करून पाठीशी राहणाऱ्या मेव्हण्याचं हे नाटक आहे’. देवरुखच्या मातीतलं हे अस्सल ब्राह्मणी व्यक्तिमत्व मिश्कील स्वभावाचं असलं तरी तितकचं बेरकी आहे. व्यक्तिमत्वाचा स्वभाव मिश्कील असला तरी ‘त वरून ताकभात’ ओळखणाऱ्या या तातोबाचा एक स्वत:चा असा एक वेगळा अंदाज आहे तो पाहण्यातच एक वेगळी मजा आहे असं विघ्नेश जोशी सांगतात. या भूमिकेसाठी कोकणातील भाषा त्याचा लहेजा जाणून घेणं गरजेच होतं. दिग्दर्शक राजेश देशपांडे हे कोकणातील असल्याने त्यांना ही भाषा चांगलीच अवगत आहे. त्यांनी ही भाषा मला उत्तमरीत्या शिकवली.

 प्रा.वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये रविवार २९ सप्टेंबरला ‘हिमालयाची सावली’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडेकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, रुतुजा चीपडे, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत.

प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची असून रंगभूषा शरद सावंत यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns